
आपल्या सगळ्यांनाच झोपेत स्वप्न पडतात, काही चांगली असतात तर काही वाईट असतात. मात्र काही माणसे अशी असतात ज्यांना रोज वाईट स्वप्न पडतात त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब असते, कारण ही बाब थेट त्यांच्या आरोग्याशी निगडीत आहे. युरोपियन अकॅडमी ऑफ न्युरोलॉजी काँग्रेसमध्ये एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला होता. जून महिन्यात हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. यात म्हटले आहे की ज्या प्रौढांना दर आठवड्याला वाईट स्वप्ने पडतात त्यांचा सत्तरी गाठण्याआधीच अवेळी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यांना वाईट स्वप्ने कधीकधी किंवा पडतच नाहीत अशांच्या तुलनेत वाईट स्वप्ने पडणाऱ्यांचा अवेळी मृत्यू होण्याची शक्यता 3 पट जास्त असते. वाईट स्वप्ने पडल्याने अकाली वृद्धत्व येतं, कारण ही स्वप्ने, वय वाढण्याची प्रक्रिया जलद होत असल्याचे संकेत देत असतात.
( नक्की वाचा: विंचू चावला तर विष तातडीनं कसं उतरवणार? आयुर्वेदिक डॉक्टरांच्या टिप्स लक्षात ठेवा! )
एखाद्या व्यक्तीला किती वेळा वाईट स्वप्ने पडतात आणि त्याच्या पेशी किती वेगाने म्हाताऱ्या होतात यावर संशोधन करण्यात आले होते. यूके डिमेंशिया रिसर्च इन्स्टिट्यूट (UK Dementia Research Institute) आणि इम्पीरियल कॉलेज लंडन (Imperial College London) येथील डॉ. अबिदेमी ओटाइकू (Dr. Abidemi Otaiku) यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले. त्यांच्या पथकाने 8 ते 10 वर्षांच्या 2,429 मुलांच्या आणि 26 ते 86 वर्षांच्या 1,83,012 व्यक्तींची माहिती गोळा करून त्याचा अभ्यास केला. या सगळ्यांचे पुढील 19 वर्ष बारकाईने निरीक्षण करण्यात आले होते.
( नक्की वाचा: 3 महिन्यांत कमी होईल 20kg वजन, फॅट्स कमी करण्यासाठी फिटनेस कोचने सांगितल्या 10 स्टेप्स )
संशोधकांनी म्हटले आहे की वाईट स्वप्ने पडल्याने झोपमोड होते आणि झोपेचा अवधीही कमी होतो. यामुळे शरीरातील पेशींवर त्याचा वाईट परीणाम होत असतो. या पेशी स्वत:हून तंदुरुस्त होण्याची क्षमता हरवून बसतात. मानसिक तणाव, अपुरी झोप आणि वाईट स्वप्नांमुळे होणारी झोपमोड या तीनही गोष्टींचा परीणाम पेशी वेगाने म्हाताऱ्या होण्यावर होत असतो. आपल्या जीवनशैलीत बदल करून वाईट स्वप्ने पडण्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकतो. नैराश्य, भीती वाटणे, मनस्थिती बिघडणे यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करून घेणे गरजेचे असते. रात्री झोपताना भयपट पाहू नये असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world