
राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Pune Medical News : पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल पडलं आहे. सह्याद्री रुग्णालयात पहिल्यांदाच (angioplasty without laser-assisted and stent) यशस्वी लेझर-असिस्टेड, स्टेंट-रहित अँजिओप्लास्टी (angioplasty) करण्यात आली आहे. 50 टक्के रुग्णांवर स्टेंट-रहित अँजिओप्लास्टी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे शरीरात अनावश्यक धातू जाणार नाही. आयुष्यभर रक्त पातळ करण्याच्या गोळ्या खाण्याची गरज नाही.
अँजिओप्लास्टी म्हणजे काय?
अँजिओप्लास्टी ही एक हृदयविकारावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेत हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या उघडल्या जातात. वैद्यकीय भाषेत याला कोरोनरी आर्टरीज असं म्हणतात. या प्रक्रियेत रक्तवाहिन्यांमध्ये कोरोनरी आर्टरी स्टेंट बसवले जाते. या स्टेंटमुळे रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला डॉक्टरांकडून अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला जातो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
70 वर्षीय मधुमेही रुग्णावर हा अत्याधुनिक उपचार करण्यात आला. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर रुग्णावर औषधांद्वारे प्राथमिक उपचार करण्यात आले होते. यांच्या धमन्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचा साठा आढळल्याने पारंपरिक स्टेंट बसविणे कठीण होते. रुग्णालाही स्टेंट टाळायचा होता. त्यामुळे, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे कार्डिओलॉजीचे संचालक डॉ. अभिजीत पालशीकर यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांनी लेझर-असिस्टेड अँजिओप्लास्टी आणि ड्रग-कोटेड बलून म्हणजे औषधयुक्त फुगा वापरण्याचा निर्णय घेतला.
नक्की वाचा - Weight Loss Drink: पोटाच्या सर्व समस्या होतील दूर, प्या या दोन गोष्टींपासून तयार केलेले गुणकारी पेय
काय आहे ही प्रक्रिया?
या प्रक्रियेसाठी एक्सायमर लेझर तंत्रज्ञान वापरण्यात आले. ज्यामुळे धमनीतील कॅल्शियम आणि कोलेस्टेरॉलचे अवरोध अत्यंत अचूकतेने काढून टाकण्यात आले. त्यानंतर ड्रग-कोटेड बलूनच्या साहाय्याने धमनीत औषध पोहोचवून ती पुन्हा अरुंद होण्याचा धोका कमी करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये कोणताही मेटल स्टेंट वापरण्यात आलेला नाही.
लेझर-असिस्टेड अँजिओप्लास्टीचे फायदे काय आहेत?
• स्टेंटशिवाय उपचार: कायमस्वरूपी मेटल स्टेंट नसल्याने धमनी पुन्हा अरुंद होण्याचा (रिस्टेनोसिस) धोका लक्षणीयरित्या कमी होतो.
• जलद रिकव्हरी: उपचारानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि 24 तासांत डिस्चार्ज मिळाला.
• मधुमेही आणि गुंतागुंतीच्या केससाठी फायदेशीर: ज्या रुग्णांना पूर्वी स्टेंट बसवण्यात आले आहेत आणि तो बंद झाला आहे, तसेच ज्या रुग्णांची रक्तवाहिन्या लहान किंवा कठीण आहेत, त्यांच्यासाठी हा उपचार उत्तम पर्याय ठरू शकतो.
नक्की वाचा - Health Tips : या खाद्यपदार्थांमुळे रोगप्रतिकार शक्तीवर होऊ शकतो परिणाम
पुण्यात प्रथमच करण्यात आलेली ही प्रक्रिया इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीच्या क्षेत्रात नवे युग सुरू करत आहे. पारंपरिक स्टेंटिंगच्या तुलनेत हा अधिक सुरक्षित आणि कमी आक्रमक पर्याय ठरू शकतो. ही तंत्रज्ञानात्मक प्रगती अँजिओप्लास्टीच्या उपचारपद्धतीत मोठा बदल घडवू शकते. विशेषतः ज्या रुग्णांना स्टेंट नको आहे किंवा ज्यांच्या रक्तवाहिन्या अधिक कठीण आहेत, त्यांच्यासाठी हा उपचार आदर्श ठरेल. भविष्यात या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणावर उपयोग होण्याची शक्यता आहे. हा उपचार महाराष्ट्रात मुंबईबाहेर प्रथमच करण्यात आला असून, पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल्सने एक ऐतिहासिक वैद्यकीय टप्पा गाठला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world