जाहिरात

सावधान! मोबाइलमधील एक गोष्ट तुमच्या मेंदूची रचनाच बदलतेय, विचारही करू शकणार नाही इतका होऊ शकतो गंभीर परिणाम

Short Term Memory Loss: मेंदूची माहिती साठवण्याची क्षमता कशी नष्ट होत आहे आणि धोका कसा वाढतोय, याबाबतचे धक्कादायक वैज्ञानिक वास्तव जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

सावधान! मोबाइलमधील एक गोष्ट तुमच्या मेंदूची रचनाच बदलतेय, विचारही करू शकणार नाही इतका होऊ शकतो गंभीर परिणाम
"Social Media And Mental Health: तुमच्या मेंदूवर होतोय गंभीर परिणाम"
Canva

Short Term Memory Loss: डिजिटलच्या युगात सोशल मीडिया आणि व्हिडीओ अ‍ॅप्सवरील रील्स, शॉर्ट व्हिडीओ स्क्रोलिंग हा आज अनेकांच्या टाइम पास करण्यासाठीचा नवा पर्याय बनलाय. पण हे शॉर्ट व्हिडीओ स्क्रोलिंग मेंदूची स्मरणशक्ती कमी होण्याचे एक मोठे कारण ठरत आहे, ज्यामुळे लोक 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस'चे बळी ठरत आहेत. वास्तविक पाहता आपला मेंदू कोणतीही माहिती लक्षात ठेवण्यासाठी तीन मुख्य टप्प्यांतून जातो. यामध्ये एन्कोडिंग (माहितीचे संकलन), कन्सालिडेशन (माहितीचे पक्के रुपांतर) आणि रिट्रीव्हल (माहितीची पुनर्प्राप्ती) अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे; ज्याद्वारे मेंदू माहिती ग्रहण करून आठवणी पक्क्या करतो आणि नंतर त्या आठवणी पुन्हा जागृत करण्यात यशस्वी होतो. यामध्ये झोप ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. 

लाँग टर्म मेमरीमध्ये अडथळा ठरतोय शॉर्ट टर्म व्हिडीओ?

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती तास-न्-तास रील्स स्क्रोल करते, तेव्हा मेंदूची एन्कोडिंग, कन्सालिडेशन आणि रिट्रीव्हलची संपूर्ण प्रक्रिया कोलमडते. मेंदूची एन्कोडिंग प्रक्रिया 'इन्फॉर्मेशन ओव्हरलोड'मुळे (माहितीच्या अतिभारामुळे) कमकुवत होते, कारण दर 15 ते 30 सेकंदांत रील बदलल्यामुळे मेंदूला त्यावर प्रक्रिया (एन्कोड) करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. परिणामी लक्ष विचलित होते आणि गोष्टी शॉर्ट-टर्म मेमरीमध्ये देखील नोंदवल्या जात नाहीत.

मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टमला थकवतोय 'स्वस्त डोपामाइन'

तज्ज्ञांच्या मते, दर 15 ते 30 सेकंदांत नवीन रील किंवा शॉर्ट व्हिडीओ पाहणाऱ्याच्या मेंदूमध्ये 'डोपामाइन' (आनंदाची भावना निर्माण करणारे न्युरोट्रान्समीटर) रिलीज होते. पण शॉर्ट व्हिडीओमध्ये प्रत्येक वेळी नवीन चेहरा, नवीन विषय आणि नवीन माहितीमुळे मिळणारा हा 'स्वस्त डोपामाइन' मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टमला (शिकण्यासाठी प्रेरित करणारी यंत्रणा) थकवून टाकतो. त्यानंतर युजर्सच्या मेंदूला अभ्यासासारख्या गंभीर गोष्टी कंटाळवाण्या वाटू लागतात आणि या गोष्टी मेंदू लक्षात ठेवू शकत नाही.

रील्स स्क्रोल करता करता लोक मोबाइल फोनवर तास-न्-तास घालवतात आणि वेळेचे भान राहत नाही. युजर्स तास-न्-तास शॉर्ट व्हिडीओ प्रोव्हाइडर ॲप्स आणि सोशल मीडिया ॲप्सवर घालवतात. यामुळे एकीकडे त्यांचा स्क्रीन टाइम वाढतो, तर दुसरीकडे व्हिडीओ स्क्रोलिंगचे हे व्यसन त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉसकडे घेऊन जात आहे.

(नक्की वाचा : Hmmm Text Psychology: तुमचा पार्टनर प्रत्येक मेसेजवर 'Hmm' किंवा 'Ok' लिहितोय? सायकोलॉजी काय सांगते ते वाचाच)

स्क्रोलिंगचे महाभयंकर व्यसन?

सध्याच्या काळात इंटरनेट सहजरित्या उपलब्ध असते आणि प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतोच. लोक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत रील्स स्क्रोल करतच असतात. अशा परिस्थितीत मेंदूला कायमस्वरूपी आठवणी तयार करण्यासाठी कमी वेळ आणि विश्रांती मिळते. यामुळे शॉर्ट-टर्म आठवणी लाँग-टर्म मेमरीमध्ये स्थलांतरित होऊ शकत नाहीत. याच कारणामुळे सकाळी पाहिलेल्या रील्स संध्याकाळपर्यंत डोक्यातून गायब होतात.

'डिजिटल ॲम्नेशिया'चा बळी ठरू शकतो रील स्क्रोलर

आज स्मार्टफोनच्या युगात कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. रील्स आणि शॉर्ट व्हिडीओ स्क्रोलिंगच्या काळात वेगवेगळ्या माहिती काही क्षणांत येत-जात राहते, यामुळे आपला मेंदू आठवणी साठवून ठेवण्यासाठी मेहनत घेणे सोडून देतो; ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'डिजिटल ॲम्नेशिया' (Digital Amnesia) किंवा 'गुगल इफेक्ट' (Google Effect) असेही म्हटले जाते. डिजिटल ॲम्नेशियाचा बळी ठरलेल्या व्यक्तीची गुगलवरील निर्भरता वाढते. हे आपण कॅल्क्युलेटरच्या उदाहरणावरून समजू शकतो, ज्याने माणसाची सामान्य बेरीज-वजाबाकी करण्याची क्षमताही कमी केली आहे.

वेळेची मर्यादा ठरवल्यास युजर्स मेमरी लॉसपासून वाचू शकतील

रील्स स्क्रोलिंगची सवय सुटणे कठीण असू शकते, पण 20-20-20 च्या नियमाचा वापर करून यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते. युझर दर 20 मिनिटांच्या स्क्रोलिंगनंतर 20 सेकंदांचा ब्रेक घेऊन रील्स स्क्रोलिंगच्या व्यसनापासून सुटका मिळवू शकतो आणि दूरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून मेंदूला मदत करू शकतो. एक चांगली झोप आठवणी जतन करण्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरते, त्यामुळे झोपण्याच्या 1 तास आधी स्क्रोलिंगची सवय सोडणे उपयुक्त ठरू शकते.

'रील्सच्या अतिस्क्रोलिंगमुळे वर्किंग मेमरीवर वाईट परिणाम'

अमेरिकेतील 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन'च्या वैज्ञानिक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, रील्स, टिकटॉक आणि युट्यूब शॉट्स खूप जास्त प्रमाणात स्क्रोल केल्याने शॉर्ट-टर्म आणि वर्किंग मेमरीवर वाईट परिणाम होऊ शकतो. जरी यामुळे मेंदूचे कोणतेही कायमचे नुकसान होत नसले, पण त्याचे वेगवान स्वरुप तुमचा मेंदू तात्पुरत्या माहितीवर प्रक्रिया करण्याची, ती साठवण्याची आणि लक्षात ठेवण्याची पद्धत बदलते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com