
Shravan 2025 Date: हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना (Shravan Month) हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपासनेचा काळ. श्रावणामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते. विशेषतः श्रावणी सोमवारचे व्रत करणे महत्त्वपूर्ण आणि फलदायी मानले जाते. काही लोक संपूर्ण श्रावण महिन्याचे उपवास करतात. श्रावणी सोमवारी (Shravani Somvar) जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवलिंगावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचेही खूप महत्त्व आहे. श्रावण महिना हा आत्मशुद्धीचा, संयमाचा आणि साधनेचा महिना म्हणून ओळखला जातो. यंदा श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरू होतोय आणि कधी समाप्त होणार आहे, एकूण किती श्रावणी सोमवार असणार आहेत, कोणकोणत्या शिवामूठ वाहव्या? अशी सर्व माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊया...
श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय आणि कधी समाप्त होणार? (Shravan Month Start Date And Shravan Month End Date)
यंदा 25 जुलैपासून सुरू होत असून 23 ऑगस्ट रोजी श्रावण महिना समाप्त होत आहे. श्रावणातील सोमवारचे व्रत करण्याचे मोठे महत्त्व आहे. यंदा चार श्रावणी सोमवार आहेत.
श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार आणि कोणत्या धान्याची शिवामूठ वाहावी याची माहिती (Shravani Somwar And Shivamuth Importance)
- पहिला श्रावणी सोमवार : 28 जुलै
शिवामूठ : तांदूळ
- दुसरा श्रावणी सोमवार : 4 ऑगस्ट
शिवामूठ : तीळ
- तिसरा श्रावणी सोमवार : 11 ऑगस्ट
शिवामूठ : मूग
- चौथा श्रावणी सोमवार : 18 ऑगस्ट
शिवामूठ : जव
शिवामूठ म्हणजे काय? (Shivamuth Importance)
श्रावण महिन्यातील (Shravan 2025 Date) प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूठ धान्य अर्पण करणे या धार्मिक प्रक्रियेस शिवामूठ असे म्हणतात. कॅलेंडर/पंचांगानुसार प्रत्येक सोमवारी वेगवेगळे आणि एक मूठ धान्य भगवान शंकराच्या पिंडीवर अपर्ण केले जाते. त्यानंतर मनोभावे पूजन आणि नैवेद्य देखील अर्पण केला जातो.
(नक्की वाचा: Bhimashankar Jyotirling Darshan: श्रावण महिन्यात भीमाशंकराचे VIP दर्शन, अन्य भक्तांसाठी साध्या रांगेची व्यवस्था)
शिवामूठ वाहण्याचे महत्त्व
श्रावण महिन्यातील (Shravan 2025 Date) प्रत्येक सोमवारी भगवान शंकरासाठी शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. परंपरेनुसार शंकराच्या पिंडीवर मूठभर धान्य अर्पण केल्यास घरामध्ये सुख, शांतता, समृद्धी नांदते आणि जीवनातील रोगराई-अडचणी दूर होतात;अशी धार्मिक मान्यता आहे.
(नक्की वाचा: Deep Amavasya 2025: दीप अमावस्या कधी आहे? कसे करावे दीपपूजन, शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या)
शिवामूठ कशी अर्पण करावी?
- कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावा.
- महादेवाला हळदकुंकू अर्पण करत नाही, असे म्हणतात. महादेवाला भस्म-लाल चंदन अर्पण करावे.
- शिवलिंगावर कापसाचे वस्त्र अर्पण करा. यानंतर महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण कराव्या.
- बेलपत्र, बेलाचे फळ, धोतऱ्याचे फळ, रुईची पाने, गोकर्णाची फुले, कन्हेराची फुले, शमीची पाने, आघाड्याची पाने या महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत.
- सर्वप्रथम बेलपत्र आणि त्यानंतर एक-एक सर्व गोष्टी अर्पण करा.
- नैवेद्य म्हणून एक फळ देखील अर्पण करावे.
- यानंतर उजव्या हातामध्ये शिवामूठीचे धान्य घ्यावे, त्यावर थोडे पाणी घ्यावे आणि तीन वेळा शिवामूठ अर्पण करावी.
- यानंतर महादेवाची आरती करावी आणि स्त्रोत म्हणावे.
भगवान शंकर भाविकांच्या मनापासून केलेल्या भक्तीने प्रसन्न होतात. शिवशंकराला जल, बेलपत्र, भस्म आणि रुद्राक्ष अतिशय प्रिय आहेत. पहाटे उठून स्नान करुन शिवलिंगावर जलाभिषेक करत 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करावा. श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करुन शिव चालीसाचे पठण करावे, यामुळे नकारात्मक विचार दूर होतात.
(नक्की वाचा: Shiva Worship: भगवान शंकराला 'ही' 5 फळे अर्पण करू नका, शिवपूजेत 'या' गोष्टी आवर्जून टाळा)
शिवामूठ व्रत कथा (Shivamuth Vrat Katha)आटपाट नगरीत एक राजा राज्य करत होता. त्याला चार सून होत्या, त्यापैकी तीन त्याच्या लाडक्या होत्या तर एक सून नावडती होती. ज्या सुना त्याला आवडत होत्या, त्यांचे सर्व उत्तम प्रकारे सुरू होते. म्हणजे त्यांना उत्तम खाणे, कपडे आणि सुखसुविधा मिळत असत. पण नावडत्या सूनेला मात्र उष्टे अन्न, जुने कपडे आणि राहण्यासाठी गुरांचा गोठा दिला गेला होता. तिच्यावर गुरे राखण्याचे काम सोपवण्यात आले होते. अशातच श्रावण महिना सुरू झाला. पहिला सोमवार उजाडला. यावेळेस नावडत्या सूनेची नागकन्या आणि देवकन्येशी भेट झाली. तिने विचारले, "कुठे जात आहात?" त्यावर त्यांनी उत्तर दिले की, "महादेवाच्या पूजेसाठी जात आहोत, शिवामूठ वाहायला".
तिने उत्सुकतेनं विचारले, "याचे काय महत्त्व आहे?" त्यांनी सांगितले की, "शिवामूठ व्रत केल्याने पतीची भक्ती मिळते, मनोकामना पूर्ण होते, मुलबाळं होतात, नावडते प्रिय होतात, वडीलधाऱ्यांचे प्रेम मिळते" हे ऐकून नावडती सून म्हणाली, "मी सुद्धा तुमच्यासोबत येते."
ती रानात त्यांच्या सोबत गेली. तिथे देवकन्या आणि नागकन्या पूजा करत होत्या. सून विचारू लागली, "हा व्रत कसा करतात?" त्यांनी नावडतीला सांगितले की, "थोडे तांदूळ, बेलाची दोन पाने, गंध, फुले, सुपारी असे साहित्य घ्या. मनापासून "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा" असे म्हणत पूजा करा. पूर्ण दिवस उपवास ठेवा. उष्टे खाऊ नका, दिवसाढवळ्या झोपू नका. काही अडचण झाली तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करून बेल वाहा आणि शांतपणे जेवण करावे. हा वसा पाच सोमवार करा – दर सोमवारी वेगळे धान्य तांदूळ, तीळ, मूग, जव, आणि सातू घेऊन शिवामूठ वाहावी."
श्रावणी सोमवारचे व्रत
पहिल्या सोमवारी नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला साहित्य दिले. नावडतीने मनोभावे पूजा केली. घरच्यांनी तिला उष्टे अन्न दिले, पण तिने ते गाईला खाऊ घातले आणि उपवास केला. दुसऱ्या सोमवारी घरून पूजा-साहित्य मागवून ती परत रानात गेली. त्यावेळेसही तिने श्रद्धेने पूजा केली. संध्याकाळी सासऱ्याने विचारले, "तुझा देव कुठे आहे?" सून म्हणाली, "रानामध्ये आहे. वाटा काटेरी आहेत. साप-वाघ आहेत. पण तिथेच माझा देव आहे."
तिसऱ्या सोमवारी सर्व घर नावडतीचा देव पाहायला निघावे. वाटेमध्ये सर्व जण दमले, जखमी झाले. त्यांना नावडतीची दया आली. दुसरीकडे नावडतीला घरच्या मंडळींची दया येऊ लागली. तिने देवाची प्रार्थना केली. तिच्या भक्तीवर भगवान प्रसन्न झाले. जंगलात सोन्याचे देऊळ प्रकट झाले, रत्नजडित खांब आणि स्वयंभू शिवपिंडी प्रकट झाली. सर्वांनी देवाचे दर्शन घेतले.
नावडती सून गंध, फुले वाहू लागली. मूग अर्पण करत शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा अशी प्रार्थना केली. हे सारे काही पाहून राजा भावुक झाला. नावडतीवरील माया वाढली, तिला दागिने दिले. पूजेनंतर सर्व देवळाबाहेर आले. इतक्यात देऊळ अदृश्य झाले.
सूनेच्या भक्तीवर भगवान प्रसन्न
राजा म्हणाला, "माझे पागोटे देवळात राहिले!" पुन्हा तो त्या जागी गेला. तिथे एक छोटेसे देऊळ होते, शिवपिंडी होती, त्यावर त्याने घातलेले पागोटे होते. त्याने सूनेला विचारले, "हे असे कसे झाले?" सून म्हणाली, "माझा देव नेहमीच तिथे होता. मी त्याच्यावर श्रद्धा ठेवली आणि त्याने मला साथ दिली." राजाने सूनेला पालखीत बसवून घरी आणले. जी सून नावडती होती, तिच आता सर्वांची आवडती झाली.
अशी ही शिवामूठीची कहाणी प्रसिद्ध आहे.
दरम्यान श्रावण महिना केवळ उपवास आणि रुद्राभिषेकाचा नव्हे तर सेवा, करुणा आणि दानधर्माचेही प्रतीक मानला जातो. या महिन्यामध्ये केलेल्या प्रत्येक शुभ कार्यामुळे कित्येक पट लाभ मिळतील, असेही म्हणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world