
छान झोप लागण्यासाठी अंथरूण-पांघरूणाशिवाय काहींना उशीची गरज भासते. काही उशा गुबगुबीत असतात तर काही उशा या कडक असतात. झोपताना उशी वापरावी की नाही असा अनेकांमध्ये वाद झडताना दिसतो. काहींचे म्हणणे असते की उशी वापरल्याने पाठ, मान दुखते त्यामुळे उशी वापरू नये, मात्र काहींचे म्हणणे असते की उशी वापरणे हे फायद्याचे ठरू शकते. या वादामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उशी न घेता झोपल्यास काय फायदे होतात?
उशी न घेता झोपल्याने आपली मान आणि पाठीचा कणा झोपेमध्ये योग्य स्थितीत राहण्यास मदत होते. ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन असलेल्या डॉ. आयुष शर्मा यांनी सांगितले की ज्या लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते त्यांनी जाड उशी वापरल्यास मान वरच्या दिशेने झुकू शकते, ज्यामुळे मानेवर ताण येऊ शकतो. सपाट पृष्ठभागावर झोपल्याने पाठीचा कणा नीट राहातो आणि मणक्यावर ताण न आल्याने त्रास जाणवत नाही.
मान आणि पाठदुखी कमी होते
डॉ. शर्मा यांनी सांगितले की, जाड उशी वापरल्याने मानेच्या मणक्याची रचना बिघडण्याची भीती असते. कडक किंवा जाड उशी वापरल्याने काहींना पाठदुखी जाणवते. पाठदुखीचा त्रास होणाऱ्यांनी उशी वापरणे बंद केल्यास त्यांचं दुखणं कमी झाल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे सपाट पृष्ठभागावर उशीशिवाय झोपण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मानेचे दुखणे कमी होण्यास याचा नक्कीच फायदा होतो.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
उशी घेऊन झोपल्याचे तोटे कोणते?
खांदेदुखीचा त्रास
उशी न घेता झोपणारे जेव्हा कुशीवर झोपतात तेव्हा त्यांचा खांदा दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते. कुशीवर झोपणाऱ्यांना डोकं आणि मणक्याला एका आधाराची गरज असते, उशीमुळे तो आधार मिळत असतो. हा आधार नसल्याने तो भार खांद्यावर येण्याची शक्यता असल्याने खांदेदुखी होऊ शकते.
डॉ.शर्मा यांनी सांगितले की, पोटावर झोपणाऱ्यांना उशीशिवाय झोपल्याने फायदा होतो. पाठीवर आणि कुशीवर झोपणाऱ्यांना योग्य पाठीचा कणा सुस्थितीत राहावा यासाठी एका आधाराची गरज असते, त्यामुळे अशा मंडळींना तज्ज्ञ उशी वापरण्याचा सल्ला देतात. मात्र रुग्णाचे दुखणे, त्याची झोपण्याची स्थिती याचे आकलन झाल्यानंतरच तज्ज्ञ हा पर्याय सुचवत असतात, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही फायदेशीर ठरते.
(नक्की वाचा- वाढलेलं वजन कमी कसं कराल? डाएटमध्ये काय खाल? दिल्ली एम्सच्या संचालकांनीच सर्व शंका केल्या दूर)
'उशी' शिवाय झोपण्यासाठी टीप्स
अनेकांना उशीची सवय मोडणे कठीण असते, त्यामुळे उशी वापरणे पूर्णपणे बंद करण्याआझी उशीची जाडी कमी करून पाहाता येईल. तसे केल्याने मान आणि मणक्याला आधार मिळू लागेल आणि आपले शरीर या बदलास सरावेल. उशी न वापरता पाठीचा कणा सुस्थितीत ठेवेल अशी गादीही आपल्याला निवडता येईल. तरीही आपल्याला उशीशिवाय झोप येत नसेल तर मानेखाली एक छोटा गुंडाळलेला टॉवेल ठेवा. उशीशिवाय झोपल्याने सतत अस्वस्थता किंवा वेदना होत असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world