
Visapur trekk accident : पावसाळ्यात पर्यटकांची पावलं गड-किल्ल्यांकडे वळतात. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी तर मोठ्या संख्येने पर्यटक किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जात असतात. मात्र येथे योग्य काळजी घेतली नाही तर अघटिक घडण्याची भीती असते. धो धो पाऊस, त्यामुळे झालेले निसरडे रस्ते अशा परिस्थिती पर्यटकांनी पावसाळी सहलीदरम्यान अधिक काळजी घेण्याची गरज आहे. विसापूर किल्ल्यावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पर्यटनसंपन्न मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्यावर जाताना निसरड्या मार्गावरून पाय घसरून खोल दरीमध्ये पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अब्राहम सिनशेप असं मृत्यू झालेल्या 29 वर्षीय पर्यटकाचं नाव आहे. तो मूळचा केरळ राज्यातील असून सध्या पुण्यातील रामवाडी परिसरात राहत होता. २ ऑगस्ट रोजी सकाळी दहा मित्रांसोबत तो मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आला होता. भाजे धबधब्याच्या बाजूने विसापूर किल्ल्यावर जायला एक पायवाट आहे. या रस्त्यावरुन जाताना पाय घसरून तो दरीत कोसळला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
नक्की वाचा - बाकावर बसण्यावरुन वाद; क्लासच्या आवारातच दहावीतील यशराजची निघृण हत्या
मावळ तालुक्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमने खोल दरीत पडलेल्या या अब्राहमचा मृतदेह शोधून काढला आहे. मुळात विसापूर किल्ल्यावर जायला अनेक वाटा आहेत. त्यातील मुख्य वाट सोपी आहे. मात्र असं असताना पर्यटक नको त्या वाटेने किल्ल्यावर जाणं किती धोकादायक ठरतं हे या दुर्घटनेतून समोर आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world