सुरज कसबे, पुणे:
Maharashtra Local Body Election Result 2025: राज्यातील २८८ नगरपरिषद तसेच नगरपंचायतींच्या निवडणूक निकालाला सुरुवात झाली आहे. पहिल्या कलांमध्ये महायुतीमध्येच मोठी चुरस पाहायला मिळत असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडत पहिला निकाल आपल्या बाजूने लावला आहे.
अजित पवारांच्या उमेदवाराची बाजी, एका मताने निवडणूक जिंकली...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला निकाल समोर आला आहे. यामध्ये अजित पवारांच्या शिलेदाराने बाजी मारली आहे. वडगावच्या मावळ नगरपंचायतीमध्ये हा पहिला निकाल लागला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राहुल ढोरे हे निवडून आले आहेत. राहुल ढोरे हे राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाचे उमेदवार होते, त्यांनी अवघ्या एका मताने निवडणूक जिंकत सर्वांनाच धक्का दिला आहे.
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: कोकणात भाजपची पिछेहाट, शिवसेना शिंदे गटाची मुसंडी
सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील निकालांनी दिग्गजांना विचार करायला भाग पाडले आहे. सोलापूरच्या मैंदर्गी नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली असून, पक्षाचे नऊ उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. सत्ताधारी महायुतीसाठी हा कौल दिलासादायक मानला जात आहे.
चंदगड नगरपालिकेत भाजपचा झेंडा...
कोल्हापूर जिल्ह्यात संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. शाहूवाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मुसंडी मारत पाच जागांवर विजय मिळवला आहे, तर जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी चंदगडमधून येत आहे. चंदगड नगरपालिकेत भाजपने थेट नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवत विजयाचा गुलाल उधळला आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमध्ये घेतलेली सभा निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.
रोहित पाटील यांना धक्का...
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मात्र आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला. तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीचे तरुण नेते रोहित पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. आर. आर. आबांच्या वारशाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world