
अमोल गावंडे, बुलडाणा
Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सकाळी भीषण अपघात झाला आहे. मेटाडोर आणि एमपी राज्याची एसटीमध्ये समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात विटा वाहून नेणाऱ्या मेटाडोरमधील 3 जण तर बसमधील एक जागीच ठार झाले आहेत.
एसटीतील 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पोलीस आणि स्थानिकांच्या सहाय्याने मदतकार्य या ठिकाणी सुरू आहे. शेगाव खामगाव मार्गावर आठवडाभरापूर्वी तिहेरी अपघाताची घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ हा भीषण अपघात आज, 15 एप्रिलच्या सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला आहे. मध्य प्रदेश परिवहन विभागाची बस अमरावतीवरून बऱ्हाणपूरकडे जात होती.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विटांची वाहतूक करणारा ट्रक राँग साइडने जात होता. आमसरी फाट्याजवळ या दोन वाहनांची भीषण धडक झाली, यात ट्रकमधील 4 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये बळीराम मानसिंग चमलाखा, पाटोड्या मानसिंग भयड्या, प्रेमसिंग बद्री धरावे, तर बसमधील एकाची ओळख पटवणे सुरू आहे. 4 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने अकोला येथे हलवण्यात आले आहे. एसटी बसमधील 20 प्रवासी जखमी असून त्यांना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world