
नाशिकमधून (Nashik Crime) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याने ऑनलाइन व्यवसायाच्या आमिषात सायबर फसवणूक झाल्याने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. प्रशांत पाटील असं या कृषी अधिकाऱ्यांचं नाव आहे. ते पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. (Agriculture officer commits suicide due to cyber fraud)
मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक फ्रेंड महिलेने 55 लाखांना गंडा घातल्याने कृषी अधिकाऱ्याने आत्महत्या केली. नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरात राहणाऱ्या प्रशांत पाटील यांनी गळफास घेत जीवन संपवले. फेसबुक तसेच ई-मेलद्वारे हापको ऑइलच्या व्यवसायाचं आमिष दाखवित फेसबुकवरील मैत्रिणीने त्यांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. यातूनच त्यांनी आत्महत्येसारखं (Agriculture officer commits suicide) टोकाचं पाऊल उचललं.
नक्की वाचा - Nashik News: 1 अधिकारी, 20 महिला, जिल्हा परिषदेतच लैंगिक छळ, तक्रारीत धक्कादायक खुलासे
प्रशांत पाटील हे सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. हापको ऑइलच्या व्यवसायासाठी त्यांनी तीस तोळे दागिने विकले होते. यातून त्यांनी पन्नास लाखांची रक्कम जमा केली होती. मात्र पन्नास लाख रुपये दिल्यानंतर त्यांना हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचं समजलं. यानंतर नैराश्यात असलेल्या कृषी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.
या सर्व प्रकारानंतर प्रशांत पाटील यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसात (cyber fraud) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत पाटील यांच्यासह अनेकांची अशाप्रकारे ऑईल व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची माहिती असून सध्या पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world