सुनील दवंगे, शिर्डी
Ahilyanagar News : कोपरगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गुंडगिरी आणि दहशतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. मावा दिला नाही म्हणून काही उपद्रवी तरुणांच्या टोळक्याने हातात धारदार हत्यारे आणि लाकडी दांडके घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक पोलिसांचा गुंडांवर धाक राहिला आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
धारणगाव रोड परिसरात वाहनांवर हल्ला
शहरातील विविध भागांसह विशेषतः धारणगाव रोड परिसरात या टोळक्याने धुमाकूळ घालत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हल्ला चढवला. धारदार हत्यारे आणि दांडक्यांच्या सहाय्याने वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आले.
(नक्की वाचा- Pune Crime: PSI असल्याचं भासवण्यासाठी वर्दी घातली, पण एक बारीक चूक अन् अधिकाऱ्याच्या हुशारीने महिलेचा पर्दाफाश)
नागरिकांची झोप उडाली, परिसरात भीतीचे वातावरण
रात्रीच्या शांततेत अचानक सुरू झालेल्या आरडाओरड, दगडफेक आणि तोडफोडीमुळे परिसरातील नागरिक झोपेतून जागे झाले. महिलांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, “मावा दिला नाही” या कारणावरून हा वाद सुरू झाल्याची चर्चा परिसरात सुरू असली तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नेमका वाद कशामुळे झाला, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
(नक्की वाचा- Iran-Israel War: जगाची चिंता वाढली, युद्ध पुन्हा भडकणार? इराणचा इस्रायलवर शक्तीशाली हल्ला)
पोलीस ठाण्यात तक्रार नाही
विशेष म्हणजे, सोमवारी सकाळपर्यंत या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. त्यामुळे दहशत माजवणारे हे नेमके कोण होते, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. मध्यरात्री इतक्या मोठ्या संख्येने तरुण उघडपणे हत्यारे घेऊन शहरात फिरत असल्याने नागरिकांकडून कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world