
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात एयर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या भयानक दुर्घटनेत 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात हे विमान कोसळलं. या अपघातात 12 क्रु मेंबर्सचाही मृत्यू झाला. यामध्ये पनवेलच्या मैथली पाटीलनेही जीव गमावला. या घटनेने मैथिलीच्या न्हावा गावावर शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात सर्व क्रू सदस्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. यात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी आणि हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचाही समावेश आहे. काल (बुधवार) दुपारीच मैथिली आपल्या ड्युटीसाठी न्हावा गावातून निघाली होती. ती एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती आणि अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणावर ती ड्युटीवर होती.
मैथिलीचे बालपण न्हावा गावातच गेले. टी एस रहेमान विद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच उराशी बाळगलेले "हवाई सुंदरी" बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने एव्हिएशन कोर्स केला. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही कुटुंबाने तिच्या शिक्षणासाठी प्रचंड कष्ट घेतले. दोन वर्षांपूर्वी तिला एअर इंडियात नोकरी लागली होती आणि तेव्हापासून ती नोकरी करत होती.
ती नेहमी न्हावा गावातून मुंबईकडे अपडाऊन करून आपली जबाबदारी पार पाडत होती. नोकरीच्या निमित्ताने अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रवासही केला होता. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय आकाशात झेपावलेली मैथिली ही अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान ठरली होती. मैथिली ही कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती. तिच्या कुटुंबात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. चुलत आजोबा जितेंद्र दामोदर म्हात्रे हे न्हावा गावाचे माजी सरपंच असून गावात त्यांचा मोठा आदर आहे. गावात ही बातमी पसरताच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world