महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या 'माझी लाडकी बहीण' योजना या महत्वाकांक्षी योजनेला वित्त विभागाने विरोध केल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा ताण येणार असल्याने वित्त विभागाने या योजनेला विरोध केल्याचे काहींचे म्हणणे आहे. यावर उत्तर देण्यासाठी अखेर राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वत: मैदानात उतरावे लागले आहे. अजित पवारांनी म्हटलंय की,“महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महिना पूर्ण होण्याच्या आतच 1 कोटींहून अधिक भगिनींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत.प्रसारमाध्यमांमध्ये तद्दन खोट्या, निराधार बातम्या पसरवून ‘फेक नॅरेटीव्ह' निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘फेक नॅरेटीव्ह' निर्माण करण्याच्या प्रयत्नांनाला राज्यातील जनता, माता-भगिनी बळी पडणार नाहीत. त्या आमच्यासोबतंच आहेत आणि राहतील,” असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.
हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेची कोटीच्या कोटी उड्डाणे
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी नॅरेटीव्ह या शब्दावर भर दिलाय. विरोधक खोटी नॅरेटीव्ह म्हणजेच कपोलकल्पित बातम्या पसरवत असल्याचा आणि त्यांचे खंडण न केल्याने आम्हाला तोटा झाल्याचे सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी वारंवार म्हटले आहे.
हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेत आता 6 नवे बदल, आता नव्या अटी-शर्ती
माझी लाडकी बहीण योजनेवरूनही विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खुद्द अजित पवारांनीही केला होता. विरोधकांच्या नॅरेटीव्हला जोरकस उत्तर देण्याचा निर्णय महायुतीतल्या तीनही पक्षांनी घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून की काय मात्र अजित पवारांना माझी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना शांत करण्यासाठी उत्तर द्यावे लागले.
हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, लाभासाठी ही अट पूर्ण करावीच लागणार
या योजनेवर दाटलेल्या संशयांचे धुके दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अजित पवारांनी एका X वर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की,
"महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.
राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही.
काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया...."
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 27, 2024
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world