Ajit Pawar Plane Crash: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाची चर्चा राज्याच्या राजकारणात सातत्यानं चर्चेत. या गंभीर विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अत्यंत परखड आणि सविस्तर उत्तर दिले. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीची सद्यस्थिती आणि त्यातील तांत्रिक त्रुटींवर प्रकाश टाकला. 'अजितदादांशी माझी 7-8 वर्षांत जेवढी मैत्री होती, तेवढी कदाचित कोणाची नसेल,' अशा भावनिक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.
तांत्रिक तपास आणि महत्त्वाचे खुलासे
या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी 'डीजीसीए'च्या (DGCA) ३ अधिकाऱ्यांचे पथक घटना घडली त्याच दिवशी घटनास्थळी दाखल झाले होते. या तपासात आता अमेरिकेतील तांत्रिक तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' हा अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी महत्त्वाचा दुवा असतो, त्यामुळे त्यातील डेटा गोळा करण्यासाठी जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बारामती विमानतळावर धावपट्टीचे डांबरीकरण पूर्ण झाले नव्हते आणि अपघातावेळी आवश्यक असणारी 'व्हिजिबिलिटी' (दृश्यमानता) 5 हजार असणे गरजेचे असताना ती केवळ 3 हजार होती. या सर्व तांत्रिक बाबींचा तपास आता सीबीआयच्या (CBI) माध्यमातून लावून धरला जात आहे.
( नक्की वाचा : Uddhav Thackeray: 'उद्धवजींच्या स्वभावात राजकारण कमी, कलाकार जास्त'; चक्क फडणवीसांनी केलं भरभरुन कौतुक! )
कर्नाटकमधील FIR वर मुख्यमंत्र्यांचा प्रहार
या प्रकरणात रोहित पवार यांनी मांडलेल्या भावनिक मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठिंबा दिला, मात्र कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या 'झिरो एफआयआर'वर तीव्र आक्षेप घेतला. 'रोहित पवार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकात एफआयआर दाखल झाला असेल, मात्र असा झिरो एफआयआर करता येत नाही, तो चुकीचा आहे,' असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी आणि राजकीय हेतूने हा तपास भरकटवण्यासाठी कर्नाटक सरकारने हे पाऊल उचलले असावे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. अपघातानंतर सुरुवातीला 'एडीआर' (ADR) रजिस्टर होतो आणि जेव्हा निष्काळजीपणा किंवा घातपाताचा ठोस पुरावा मिळतो, तेव्हाच एफआयआर दाखल करून चार्जशीट सादर केली जाते, असे कायदेशीर स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याण डोंबिवलीत भाजपा-शिवसेनामध्ये संघर्ष चिघळला, 'त्या' 65 इमारतींच्या रहिवाशांचे काय होणार? )
दोषींना पाताळातूनही शोधून काढू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात मुख्यमंत्र्यांची 3 वेळा भेट घेतली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची मागणी केली आहे. अधिवेशन संपल्यानंतर या संदर्भात भेट घडवून आणली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 'अजितदादांच्या अपघातात जर कोणी दोषी आढळले, तर त्याला आकाश-पाताळ एक करून बाहेर काढू आणि कठोर शिक्षा करू,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मृतदेह जमिनीतून खोदून काढण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world