Ajit Pawar Plane Crash death : धडाडीचा लोकनेता...जनमानसात कायम रमणारा...महाराष्ट्रातील राजकारणातला 'दादा' अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अख्खा महाराष्ट्रातच काय देशाला धक्का बसला आहे. अजित पवार कायम लोकांमध्ये रमले. त्यांचा प्रशासनावर वचक होता. अधिकाऱ्यांनाही ते सर्वांसमोर झापायचे. मनात एक ओठात एक असं ते कधीच वागले नाही. जे वाटलं ते बेधडकपणे बोलून मोकळे व्हायचे. कोणालाही हेवा वाटावा अशा पद्धतीने त्यांनी बारामतीचा विकास केला. वयाच्या ६६ व्या वर्षी अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षक आणि वरिष्ठ हवालदार विपीद जाधव होते. विमानाचे पायलट सुमित कपूर होते, तर सहवैमानिक संभवी पाठक होत्या. पिंकी माळी या विमानामध्ये फ्लाईट अटेंडंट म्हणून होत्या. या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून अजित आशाताई अनंतराव पवार यांची ओळख आहे. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील देवळाली-प्रवरा या गावी झाला. मूळचे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील असलेल्या अजितदादांनी बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या पवार कुटुंबात समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले. पुढे त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी विवाह केला. पार्थ आणि जय ही दोन मुले आहेत.
राजकारणातला दादा हरपला 💔💐#AjitPawar #MaharashtraPolitics pic.twitter.com/G67imdza3V
— Sachin ( Modi Ka Parivar ) (@SM_8009) January 28, 2026
अजित पवारांची राजकीय कारकीर्द
त्यांच्या राजकीय प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात १९९१ मध्ये झाली. त्यांनी जून १९९१ ते सप्टेंबर १९९१ या अल्प कालावधीसाठी लोकसभा सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी राज्य राजकारणावर लक्ष केंद्रित केले आणि १९९१ पासून सलग आजपर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. अजित पवारांनी सहा वेळेस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
— Ganesh Borhade Patil (@GaneshBorhadeP1) January 28, 2026
अजित पवार यांनी राज्य शासनात विविध महत्त्वाची पदं भूषवली
राज्यमंत्री: १९९१ ते १९९३ या काळात त्यांनी कृषी, फलोत्पादन, ऊर्जा आणि नियोजन या खात्यांची जबाबदारी सांभाळली. कॅबिनेट मंत्री: १९९९ पासून त्यांनी जलसंपदा (पाटबंधारे), ग्रामविकास आणि पाणीपुरवठा यांसारखी महत्त्वाची खाती यशस्वीपणे हाताळली. उपमुख्यमंत्री: त्यांनी अनेकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१० पासून ते आजपर्यंत (५ डिसेंबर २०२४ पासून नवीन कार्यकाळ) त्यांनी या पदावर राहून राज्याच्या वित्त व नियोजन विभागाला गती दिली आहे. विरोधी पक्षनेते: जुलै २०२२ ते जून २०२३ या काळात त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही प्रभावी भूमिका बजावली.
करून दाखवायची धमक आणि शब्दाला जागणारा नेता!
— दाजी 🚩 (@SaffrronBeast) January 28, 2026
🙏🙏🙏🙏🥺🥺😭😭😭😭#अजितदादा pic.twitter.com/Vfx49AtX9y
सहकार आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान
केवळ राजकारणच नव्हे, तर सहकार आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. सहकार क्षेत्र: त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक येथे नेतृत्व केले आहे. तसेच 'महानंद' आणि 'रयत शिक्षण संस्था' यांसारख्या संस्थांवरही त्यांनी काम केले आहे. क्रीडा: त्यांना क्रिकेट आणि टेनिसची आवड आहे. त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन आणि कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले. ३० जून २०२३ पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. समाजकार्य हा त्यांचा छंद असून, अभ्यासासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इस्रायल यांसारख्या अनेक देशांचे दौरे केले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world