जाहिरात

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्ब? 50 कोटींचा विमा आणि... आजवरचा सर्वात मोठा आरोप

Ajit Pawar Plane Crash Mystery:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्ब? 50 कोटींचा विमा आणि... आजवरचा सर्वात मोठा आरोप
Ajit Pawar Plane Crash Mystery: अजित पवारांच्या अपघात प्रकरणात एक नवा आरोप करण्यात आला आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Ajit Pawar Plane Crash Mystery:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक शंका उपस्थित केल्या आहेत. या प्रकरणातील विमा रकमेचा आकडा आणि पायलटची भूमिका यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा आणि घातपाताची शंका

अमोल मिटकरी यांनी या अपघातातील विमानाशी संबंधित VSR कंपनीवर थेट निशाणा साधला आहे. मिटकरी यांच्या दाव्यानुसार, संबंधित कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता.

या विम्याच्या अवघ्या महिनाभरानंतर म्हणजेच जानेवारी महिन्यात अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. एवढ्या मोठ्या रकमेचा विमा अचानक का काढण्यात आला, असा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे. हा केवळ अपघात आहे की त्या पायलटला सुसाईड बॉम्ब म्हणून तिथे बसवण्यात आले होते, या अँगलने देखील तपास व्हायला हवा, अशी खळबळजनक मागणी त्यांनी केली आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar Death :बॉम्ब,कट, अपघात की घातपात? अजित पवारांच्या मृत्यूभोवतीच्या 7 मोठ्या शंका; उत्तरं कधी मिळणार? )

उच्चस्तरीय चौकशी आणि विशेष अधिवेशनाची मागणी

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अमोल मिटकरी यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असली तरी, मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीनंतर माजी आमदार भुयार यांच्यासह ते स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहेत. 

केवळ चौकशीवर न थांबता या विषयावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे 2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आग्रही मागणी देखील मिटकरी यांनी केली आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar Death :अजित दादांची चप्पल चोरून घरात केली होती पूजा; अमोल मिटकरींनी सांगितली काळजाला भिडणारी आठवण )

ऐतिहासिक मृत्यूंच्या रहस्यांचा दिला दाखला

अजित पवार यांच्या मृत्यूचे सत्य महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे, अशी भावना व्यक्त करताना मिटकरी यांनी ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत आजही अनेक शंका आणि रहस्ये आहेत. 

मात्र, अजित दादांच्या बाबतीत असे घडू नये आणि हे प्रकरण केवळ अपघात म्हणून दडपले जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला. तंत्रज्ञानाच्या युगात केवळ थातूरमातूर अहवाल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करण्याबाबत जे वक्तव्य केले आहे, त्यावरही मिटकरी यांनी भाष्य केले. रोहित पवार यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती अवश्य मांडली पाहिजे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे सुनील तटकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत भाष्य करणे टाळत त्यांनी केवळ सत्याचा शोध घेण्याला प्राधान्य असल्याचे सांगितले. 

अजित पवार हे आमचे सर्वस्व होते आणि त्यांच्या मृत्यूमागचे खरे कारण शोधण्यासाठी आपला लढा सुरूच राहील, असे मिटकरी यांनी सांगितले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com