Ajit Pawar Plane Crash Report : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता एक महिना पूर्ण झाला असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही सुन्न आहे. या भीषण अपघाताच्या कारणांचा शोध घेणाऱ्या विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) आपला 22 पानांचा प्राथमिक अहवाल आता प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून अपघाताच्या वेळची परिस्थिती आणि तांत्रिक त्रुटींबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
विमान अपघात तपास ब्युरोचा सविस्तर अहवाल
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत AAIB ने सादर केलेल्या या 22 पानांच्या अहवालात अपघाताच्या नेमक्या क्षणांचे वर्णन करण्यात आले आहे. अहवालानुसार, अपघातग्रस्त विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी एका झाडावर जोरात धडकले होते. या धडकेनंतर विमानाचा ताबा सुटला आणि ते धावपट्टीपासून काही अंतरावर कोसळले.
या अपघातात विमानाचे कॉकपिट आणि केबिन पूर्णपणे नष्ट झाले असून केवळ शेपटीचा भाग सुरक्षित राहिला आहे. दुर्घटनेनंतर विमानाने पेट घेतल्याने मोठी हानी झाली, ज्यामुळे फ्लाईट डाटा रेकॉर्डर देखील उष्णतेमुळे खराब झाला आहे. मात्र, तपासासाठी त्यातील रॉ डाटा डाऊनलोड करण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे.
( नक्की वाचा : Chhagan Bhujbal : पार्थिव समोर होतं आणि तुम्ही विलीनीकरण मागत होता?'; भुजबळांचा सवाल, NCP च्या बैठकीत सन्नाटा )
दृश्यमानतेचा मोठा अडथळा
अपघाताच्या वेळी बारामती येथील हवामान आणि दृश्यमानता कशी होती, याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. व्हिज्युअल फ्लाईट नियमांनुसार (VFR) विमान उतरवण्यासाठी किमान 5 किमी दृश्यमानता असणे आवश्यक असते. मात्र, ज्यावेळी हा अपघात झाला, तेव्हा बारामतीमध्ये दृश्यमानता केवळ 3 किमी इतकीच होती.
पुण्याच्या हवामान विभागाने (METAR) तर त्या वेळी केवळ 2 किमी दृश्यमानतेची नोंद केली होती. बारामती परिसरात त्या दिवशी धुक्याचे प्रमाण अधिक होते, ज्यामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज येण्यात अडचणी आल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Rohit Pawar: अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? रोहित पवारांच्या आरोपाला सरकारचं उत्तर, तपासला नवी दिशा )
बारामती विमानतळावरील अपुऱ्या सुविधा
अहवालात बारामती विमानतळावरील सोयीसुविधांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बारामती हे एक अनियंत्रित हवाई क्षेत्र असून तेथे अधिकृत हवामान केंद्र (MET facility) उपलब्ध नाही. येथील धावपट्टीच्या खुणा फिकट झाल्या होत्या आणि लँडिंगसाठी आवश्यक असणारी आधुनिक उपकरणे देखील तिथे उपलब्ध नव्हती. विमानतळावर केवळ एका बाजूला विंडसॉक्स होता आणि तिथे अग्निशमन दलाचे युनिट किंवा सीमाभिंत यांसारख्या मूलभूत सुरक्षा यंत्रणांचाही अभाव असल्याचे निष्कर्षात म्हटले आहे.
कसा घडला अपघात?
अहवालातील माहितीनुसार, रनवे 11 च्या 50 मीटर डाव्या बाजूला विमानाचा शेवटचा आघात झाला. हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी बाजूला असलेल्या झाडांना धडकले आणि त्यानंतर भीषण आग लागली. धावपट्टीवर पसरलेली सैल रेती आणि लँडिंग एड्सची कमतरता यामुळे ही परिस्थिती ओढवली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशिक्षण अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या दृश्यमानतेच्या मूल्यांकनावरच विमानाचे लँडिंग अवलंबून होते, जे तांत्रिकदृष्ट्या अपुरे ठरले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world