
देवा राखुंडे, प्रतिनिधी
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. बारामतीमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात गंभीर इशारा दिला आहे. नियम मोडणाऱ्या बारामतीकरांना उपमुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. बारामतीमध्ये एका हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
का संतापले पवार?
अजित पवार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, काही जण चुका करत आहेत. रस्त्यावर कचरा टाकतात. जनावरे चरायला सोडतात. मी त्यांना कृपा करुन सांगतो, आता ती जनावर कोंडवड्यात घातली. नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो. त्या मालकांना निर्वाणीचा इशारा देतो, आता ऐकलं तर ठीक नाही तर मालकांवर केसेस होतील.
तुमच्या दारात जनावरांना बांधा. काय खायला, प्यायला घालायचं ते घाला, बारामती जी चांगली करतो ती सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाही, या शब्दात अजित पवार यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
( नक्की वाचा : Ravindra Chavan: 'शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर वाईट वाटलं', चव्हाण यांनी पहिल्यांदाच सांगितलं नाराजीचं कारण )
त्यांना टायरमध्ये...
अजित पवार यांनी या भाषणात राँग साईडनं जाणाऱ्या वाहनचालकांनाही इशारा दिला. ते म्हणाले, कधी कधी मोटरसायकलवाले इकडे तिकडे बघतात. हळूच ओव्हरटेक करत रॉंग साईडने जाण्याचा प्रयत्न करतात. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत.
'जिथे माणसांना बसायला केलं आहे तिथे एक जण मोटरसायकल घालून निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारतोय. मी गाडी वळवली आणि पोलिसांना सांगितले याची गाडी ताब्यात घे. टायरमध्ये घाल, तर तो म्हणतोय नाही दादा चुकलं,' अशी आठवणही अजित पवार यांनी यावेळी सांगितली.
कुणीही अजिबात नियम मोडू नका. तो अजित पवार असो किंवा अजित पवारांचा कुणी नातेवाईक, सर्वांना नियम सारखा. मी जे करतो ते सर्व बारामतीकरांसाठी करतो. मी अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत. तिथं कुणीही येत आहे. जनावरं खात आहे, ते चालणार नाही, अशा शब्दात अजित पवारांनी बारामतीकरांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world