शुभम बायस्कार, अमरावती
अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरीची शक्यता आहे. रवी राणा महायुतीत सहभागी असताना देखील त्यांनी युवा स्वाभिमान पक्षावर दर्यापूर विधानसभेत उमेदवार दिला. रमेश बुंदिले आज युवा स्वाभिमान पक्षाकडून आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी रवी राणा यांनी अभिजीत अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दर्यापूर विधानसभेची लढाई कुठल्या पक्षाची नाही. पक्षाच्या पलीकडे जाऊन जनतेला न्याय देण्यासाठीची ही लढाई आहे. रमेश बुंदेले यांना महायुतीमध्ये उमेदवारी द्यावी, अशी मागणी रवी राणांनी केली होती. मात्र या मतदारसंघात बाहेरचं पार्सल एबी फॉर्म घेऊन आले. म्हणून आज ही लढाई लढावी लागली, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
(नक्की वाचा - बारामतीत काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत; दोन्ही पवार आज भरणार उमेदवारी अर्ज )
महायुतीची उमेदवारी अडसूळ यांना मिळाल्यानंतर रवी राणा यांच्यावर दबाव आहे. जे नेते मला फोन करतात ते नेते उमेदवार गेल्यानंतर तुमचं व्यवस्थित चालू द्या असं सांगतात. म्हणून आम्ही एक कान बहिरा ठेवला आहे, असं देखील रवी राणा यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Shivsena List : शिवसेना शिंदे गटाची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंसमोर 'या' खासदाराचं आव्हान)
या सर्व पार्श्वभूमीवर अमरावतीत राणाविरुद्ध अडसूळ वाद पेटण्याची शक्यता आहे. युवा स्वाभिमानकडून बंडखोरी झाल्यास ते महायुतीचे घटक राहणार नाहीत. महायुतीत बंडखोरी झाल्यास बडनेरा विधानसभा मतदारसंघात महायुती स्वतंत्र उमेदवार देईल, असं अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं आहे. रवी राणा माजी आमदार रमेश बुंदिले यांना फितवून त्यांचा युवा स्वाभिमानमध्ये पक्षप्रवेश करुन घेत त्यांना उमेदवारी देत आहेत. असं झाल्यास बडनेरामध्ये महायुती स्वतःचा उमेदवार देणार असं अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं.