
Amazon investment in Maharashtra : राज्यातील डिजिटल क्रांतीला गती देण्यासाठी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने (AWS) राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मुंबईतील डेटा सेंटरसाठी पहिल्या टप्प्यात 8.4 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक सुरू केली असून, ही गुंतवणूक आधीच राज्यात कार्यरत असलेल्या 3.7 बिलियन (अब्ज) डॉलर्सच्या च्या डेटा सेंटर गुंतवणुकीव्यतिरिक्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा' निवासस्थानी एका ऑनलाइन कार्यक्रमात या डेटा सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले.
दावोसमधील कराराची अंमलबजावणी सुरू
या कराराची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, राज्याची ओळख देशातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून निर्माण झाली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केली होती. याच परिषदेत ॲमेझॉनने राज्यात 'क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर' क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला होता.
या कराराची अंमलबजावणी आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे, ज्यामुळे राज्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीमध्ये ॲमेझॉनचा सहभाग वाढणार आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासात कंपनी भविष्यातही सक्रिय योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
( नक्की वाचा : Thane Metro ठाणे मेट्रोचा 'ऐतिहासिक' दिवस; 16,000 कोटींचा प्रकल्प 'ट्रॅक'वर, वाचा 13 लाख प्रवाशांना कसा फायदा )
राज्यात 'इज ऑफ डूइंग बिझनेस' (व्यवसाय सुलभता) वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. परवानग्यांची प्रक्रिया जलद करण्यासाठी ‘इज ऑफ डूइंग बिझनेस वॉर रूम' कार्यरत आहे. तसेच, उद्योजकांना 'रिअल टाइम इन्फॉर्मेशन' उपलब्ध करून देणारी प्रणालीही लागू करण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळेच परदेशी गुंतवणुकीला राज्यात अधिक चालना मिळत आहे.
ॲमेझॉनच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात डिजिटल क्रांती होणार!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 23, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या मुंबईतील डेटा सेंटरचे (ऑनलाईन) भूमिपूजन पार पडले. या माध्यमातून कंपनीने राज्यातील पहिल्या टप्प्यातील $8.4 बिलियनच्या गुंतवणुकीचा… https://t.co/qXjSuhmoLq pic.twitter.com/OoxcJO6bTt
'थिंक बिग मोबाईल व्हॅन'चा शुभारंभ
या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ‘थिंक बिग मोबाईल व्हॅन' ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हा उपक्रम ॲमेझॉनच्या STEM (Science, Technology, Engineering, and Mathematics) लॅब उपक्रमाचा भाग आहे. ही व्हॅन शासकीय शाळांमध्ये जाऊन सुमारे 4,000 विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संशोधन आणि नवनवीन संकल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world