राहुल वाघ, नाशिक:
Iran israel War: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्ध पेटले असून त्याची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळे तेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातही पेट्रोल, डिझेल महागण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच आता या युद्धामुळे नाशिकच्या अंबड व सातपूर एमआयडीसी येथील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस पुरवठ्याअभावी येथील १२०० उद्योगांना फटका बसण्याची शक्यता दिसत आहे.
युद्धाची झळ, गॅस पुरवठेवर परिणाम..
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर तीव्र परिणाम झाल्याने नाशिकमधील तब्बल बाराशे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग प्रभावित झाले आहेत. शासनाने व्यावसायिक एलपीजी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर एमएनजीएलकडून ४० टक्के पुरवठा कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्लेटिंग, पावडर कोटिंग उद्योग संकटात सापडले आहेत.
तर काही उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.नाशिकला नियमित एक हजार २०० टन दरमहा एलपीजी गॅसचा पुरवठा इंडस्ट्रीजला केला जातो. आणि २ हजार टन एलपीजी गॅस हॉटेल वगैरे ठिकाणी पुरविला जातो. तर साडेतीन लाख किलो एमएनजीएल गॅसचा पुरवठा केला जात आहे. मात्र, युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर तीव्र परिणाम झाला आहे.
1200 उद्योग बंद होण्याच्या मार्गावर
सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असे सूक्ष्म, लघु, मध्यम सुमारे १२०० ते १३०० उद्योग आहेत. सूक्ष्म उद्योगांना दररोज १०० ते २०० किलो, मध्यम उद्योगांना दीड टन किलो आणि मोठ्या उद्योगांना फरनेससाठी अधिक गॅस लागतो. यात ९७ टक्के एलपीजी घरगुती वापरासाठी आणि ३ टक्के व्यावसायिक वापरासाठी दिला जातो.
आता ३ टक्के व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. शिवाय सरकारने एलपीजी गॅस पुरवठा बंद करून दर ६८ रुपयांवरून ८६ रुपये केला आहे. आणि सबसिडीदेखील बंद करून टाकली आहे. त्यामुळे एलपीजी वापर करणारे उद्योग पूर्णपणे संकटात सापडले आहेत. एमएनजीएलची पाइपलाइन सर्व उद्योगात पोहोचलेली नाही. तरीही एमएनजीएलने ४० टक्के पुरवठा कमी करण्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे बाराशे उद्योग 'गॅस'वर असून, प्रक्रिया ठप्प होण्याची भीती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world