शुभम बायस्कार, अमरावती
Amravati Election : अमरावती महानगरपालिकेच्या निकालांनी सर्वांनाच चकित केले आहे. 2017 च्या निवडणुकीत 45 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यंदा मोठा फटका बसला आहे. यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या रणनीतीवर आणि रवी राणा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 2017 मध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यंदा केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागले.
यशोमती ठाकूर यांची टीका
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने भाजपचा व्यवस्थित गेम केला आहे. 45 वरून भाजप आता थेट 25 जागांवर आली आहे. यामुळे भाजपचा सत्तेचा माज उतरला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने आपण कुबड्यांशिवाय सत्ता स्थापन करू, असा दावा केला होता.
(नक्की वाचा- TMC Election 2026: ठाण्याचा 'गड' शिंदेंकडेच! महायुतीला निर्विवाद बहुमत; वाचा 131 नगरसेवकांची संपूर्ण यादी)
मात्र, आता त्यांना सत्ता स्थापनेसाठी इतरांचे पाय धरवे लागतील आणि एक प्रकारे 'लंगडं सरकार' अमरावतीत पाहायला मिळेल, असे त्या म्हणाल्या. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होती. भाजपने कितीही पैसा खर्च केला असला तरी जनतेने त्यांना नाकारले आहे," अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.
(नक्की वाचा- Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...)
भाजपच्या प्रचाराचा बोट
यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या निवडणूक नियोजनावरही बोट ठेवले. भाजपसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल 19 सभा घेतल्या. अनेक मंत्री आणि आमदारांची फौज मैदानात उतरवली होती. इतकी मोठी रसद पुरवूनही जनतेने भाजपला नाकारले असून, युवा स्वाभिमान पक्षाने भाजपच्या व्होट बँकेला खिंडार पाडल्याचे स्पष्ट झाले आहे, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world