
शुभम बायस्कार, अमरावती: कर्तव्यावरील पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदारपुत्र आणि धारणी बाजार समितीचे सभापती रोहित राजकुमार पटेल याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चिखलदरा पोलिसांनी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यासह त्यांच्या 300 ते 400 सहकाऱ्यांविरुद्ध बेकायदेशीररीत्या रास्ता रोको, सार्वजनिक वाहतूक अडवणे व मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केलेत.
अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील नागापूरस्थित वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा येथे दोन दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडल्यामुळे त्या शाळेतील 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर 30 जुलै रोजी त्या मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर पार्थिव मुलीच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
Pune News: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील हरणांचे मृत्यू प्रकरण,अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
प्रेत अंत्यसंस्कारासाठी मुलीच्या मूळ गावी गांगरखेडा येथे न नेता ते धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयात नेऊन मृत मुलीच्या परिवारास जोपर्यंत 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत तिचे प्रेत प्रकल्प अधिकारी कार्यालयातच ठेवून आंदोलन करणार, अशी भूमिका माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित यांनी घेतली. दरम्यान राजकुमार पटेल, रोहित पटेल व इतरांनी घटांग टी-पॉइंट येथे विनापरवानगी सार्वजनिक रस्ता अडवून मुलीचे प्रेत रस्त्यावर ठेवले. यावेळी त्यांनी प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊ द्या; अन्यथा आम्ही प्रेत घेऊन इथेच बसतो, असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घालत रास्तारोको केला.
थोड्या वेळाने राजकुमार पटेल हे त्यांच्या सहकाऱ्यांसह मुलीचे प्रेत हातात घेऊन धारणी रोडने धावत निघाले. ते प्रेत रोहित पटेल चालवत असलेल्या वाहनात ठेवले तथा धारणीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रोहित पटेल याने त्याची कार जीव घेण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी रोहित पटेल याला गुन्ह्यात अटक करण्यात आली. असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर राजकुमार पटेल यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world