
राज्य व जिल्हास्तरावर 31 ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. सावे म्हणाले, राज्य शासनाचा हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे. या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमातून या समुदायाचा संघर्ष, योगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचेल.
नक्की वाचा - Kalyan News: स्मार्ट मीटरने दिला वीज बील वाढीचा शॉक, भरमसाठ रकमेमुळे सर्वच हैराण
या दिवशी भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी, आधारकार्ड नोंदणी, जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक दस्तऐवजांची माहिती देणाऱ्या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
(नक्की वाचा: Malegaon Bomb Blast : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी)
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील व जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात व अंमलबजावणीची कार्यवाही सुनिश्चित करावी. 31 ऑगस्ट रोजी सार्वजनिक, साप्ताहिक किंवा स्थानिक सुट्टी असली तरीही 'भटके विमुक्त दिवस' याच दिवशी साजरा करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world