प्रतिनिधी, स्वानंद पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीच्या आधी बीड येथे भव्य मराठा आरक्षण जनजागृती तथा शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीला 5 लाखांपेक्षा जास्त मराठा समाज बांधव उपस्थित राहणार असल्याच्या माहिती आयोजकांनी दिली असून या रॅलीत जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती सहभाग घेणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं.
गुरुवार 11 जुलै रोजी होणाऱ्या या रॅलीचं नेतृत्व मनोज जरांगे स्वतः करणार आहेत. यासाठी बीड येथे रविवारी सकल मराठा समाजाकडून व्यापक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत तालुका निहाय नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या रॅलीसाठी गावागावात जाऊन निमंत्रण दिले जाणार आहे. यावेळी प्रत्येकाला आपापली जबाबदारी देण्यात आली. रॅलीला आलेल्या समाजबांधवासाठी पाणी, अल्पोपहार, औषधांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
नक्की वाचा - 18 व्या लोकसभा अधिवेशनाला आजपासून सुरुवात, पहिल्या दिवशी खासदारांचे शपथविधी पार पडणार
या रॅलीला सकाळी 11 वाजता सुरुवात होऊन दुपारी 3 वाजता रॅलीचा समारोप होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, बस स्टँड,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर रॅलीचा समारोप होईल. रॅलीनंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभाही होणार असून उपस्थित समाज बांधवांना ते संबोधित करणार आहेत. या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे आता राज्याचे लक्ष लागलेले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world