देवा राखुंडे, बारामती:
"कुठलाही साखर कारखाना अडचण आल्यावर, माझ्या हातात सत्ता होती तोपर्यंत मी पक्ष बघितला नाही, जात बघितली नाही. सरसकट मदत केली. असे असताना तुमच्या सभासदांना तुमच्या कामगारांना तुम्ही दम देता ? काय दम देतात? आता कोणी दम दिला तर मला कळवा मी येतो. तुमच्याबरोबर त्याच्या घरीच येतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच गेली तीस वर्ष अजित पवारांनी इथला कारभार सांभाळला.जे काही लोकांसाठी करता येईल ते त्यांनी केलं. माझे 30 वर्ष झाले. अजित पवारांचे 30 वर्ष झाले. आता पुढचे 30 वर्ष काय करायचं सांगा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार?
"आजचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाहीत. जो शेतकऱ्याचे हित बघत नाही त्यांचं माझं जमत नाही. म्हणून आज समाजकारण बदलायच असेल तर अर्थकारण बदललं पाहिजे. अर्थकारण बदलायचा असेल तर शेतीचा धंदा सुधारला पाहिजे. शेतीमालाच्या किंमती वाढल्या पाहिजेत. खते-औषधाच्या किंमती कमी झाल्या पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन येईल ते परिवर्तन आणायचे आहे. त्यासाठी सत्ता परिवर्तन हा निकाल घ्यायचा आहे. मी महाराष्ट्रात फिरतोय लोकांची मनस्थिती बदलाला अनुकूल आहे, असे शरद पवार म्हणाले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दम दिल्यास मला सांगा..
"पतसंस्था चालक कारखान्याचे चेअरमन आणि बाकीचे लोक मतदारांना दम देत आहेत. अशा चिठ्ठ्या मला आल्या आहेत. कामगारांना नोकरीवरुन काढू असं सांगत आहेत. माझी विनंती आहे जे कोण चेअरमन असतील या कारखान्याच्या हितासाठी माझ्याकडे 50 वेळा आले. मी पक्ष बघत नाही, त्यांची जात माझ्या दृष्टीने एकच ती म्हणजे शेतकरी. कुठलाही साखर कारखाना अडचण आल्यावर माझ्या हातात सत्ता होती तोपर्यंत मी पक्ष बघितला नाही. जात बघितली नाही. सरसकट मदत केली. त्याला सोमेश्वर कारखाना सुद्धा अपवाद नाही. असं असताना तुमच्या सभासदांना तुमच्या कामगारांना तुम्ही दम देता? आता कोणी दम दिला तर मला कळवा. मी येतो तुमच्याबरोबर त्याच्या घरी," असा थेट इशाराही शरद पवार यांनी दिला.
"आम्ही कधी चुकीच्या रस्त्याने जात नाही पण लोकशाहीमध्ये मत द्यायचा हा तुमचा अधिकार आहे. माझा अधिकार नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. त्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडू नका. पुन्हा माझ्या कानावर जर बाब आली तर मी आहे. तुम्ही काळजी करू नका. कोणीच तुम्हाला वाचू शकणार नाही. पण मला या रस्त्याने जायचं नाही. माणसं आपली आहेत. माणसं चुकले असतील कोणीतरी त्यांना दम दिला असेल. त्यामुळे कदाचित त्यांनी हे केलं असेल. माझं सांगणं आहे बाबांनो आपल्या भागात असलं आपण कधी केलं नाही ते करू नका. विरोधासाठी विरोध करायचा असेल तर करा तो तुमचा अधिकार आहे. पण दुसऱ्याच्या मत स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा तुमचा अधिकार नाही. कायद्याने तुम्हा सर्वांचे अधिकार सारखे आहेत. लोकशाहीच्या विरोधात कोणी जाऊ नये एवढेच माझं सांगणं आहे," असंही शरद पवार म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world