Nashik Municipal Corporation : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान शांतता, सुव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. बैठकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
गैरप्रकार आढळल्यास आंदोलनाचा इशारा
निवडणूक काळात पैशांचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्याचे प्रकार आढळल्यास संबंधित उमेदवार आणि पक्षाविरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल, असा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.
कडक बंदोबस्ताची मागणी
मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी तसेच मतदानाच्या दिवशी पोलिस प्रशासनाच्या मदतीने विशेष पथके तयार करून अंबड परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन उमेदवारांनी करावे, अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच कोणताही अधिकारी एखाद्या उमेदवाराच्या समर्थनार्थ काम करत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
