स्वानंद पाटील बीड: बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राजकारण तापले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस हे आवाज उठवत असून नवनवे गौप्यस्फोट करत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने गुन्हेगारी ूबोकाळत असल्याचा आरोप सुरेध धस करत आहेत. अशातच आता त्यांनी बीडमध्ये झालेल्या आणखी एका हत्या प्रकरणाचा खुलासा केला असून त्यामध्येही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
22 ऑक्टोबर 2023 रोजी बीडमध्ये महादेव दत्तात्रय मुंडे या तरुणाचा खून झाला. या खुनातील आरोपी अद्याप मोकाट असून आकाच्या मुलाभोवती म्हणजेच सुनील कराडच्या भोवती फिरत असल्याचा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केला. या प्रकरणात एकूण सहा आरोपी असून तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींना वाचवण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असा गंभीर आरोपही सुरेश धस यांनी केला.
(नक्की वाचा - Saif Ali Khan Attacked : सैफ प्रकरणात मोठी अपडेट, अखेर हल्लेखोराला ठाण्यातून अटक; गुन्ह्याचीही कबुली)
महादेव मुंडे यांना पाच ते सहा जणांनी जीवे मारले. त्यावेळी सानप नावाचे पोलीस अधिकारी होते. महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींची नावे सानप यांनी शोधली होती. मात्र आकांनी त्या आरोपींना न पकडण्यासाठी दबाव टाकला. त्याऐवजी राजाभाऊ फड आणि आणखी दोघा- तिघांना अटक करा असे सांगण्यात आले. मात्र हे पाप मी करणार नाही असे म्हणत सानप यांनी स्वतःहून बदली करुन घेतली, असा खुलासा सुरेश धस यांनी केला आहे.
महादेव मुंडे हे परळी येथील व्यावसायिक होते त्यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील भोपला हे आहे. 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील वनविभागाच्या कार्यालयाच्या समोरील आवारात त्यांचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने वार करत हा खून झाल्याचे समोर आले होते. या घटनेच्या तीन महिन्यानंतर ही आरोपी विरोधात कारवाई न झाल्याने 16 जानेवारी 2024 रोजी परळी शहर बंदचा इशारा देण्यात आला होता. या बंदला व्यापारी संघटनेचाही पाठिंबा होता. आता याच महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
(नक्की वाचा- Saif Ali Khan : सैफ अली खानच्या कुटुंबीयांना धक्का, 15 हजार कोटींची संपत्ती सरकार ताब्यात घेणार!)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world