जाहिरात

वरळी हिट अँड रन प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा, म्हणाले...

अपघात झाला त्यावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा गाडी चालवत होता. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत.

वरळी हिट अँड रन प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा, म्हणाले...
मुंबई:

मुंबईतील वरळी येथे भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना रविवारी पहाटे घडली होती. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अपघात झाला त्यावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा गाडी चालवत होता. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकटवर्तीय देखील मानले जातात.

पोलिसांनी आरोपीच्या मिहीर शहा याला देखील अटक केली आहे.मिहीर शहा आणि चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विरोधकांनी या मुद्दावरून आरोप करण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मुख्यमंत्री कार्यालयाच्या X अकाऊंटवरून पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली आहे.  "महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन' च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई केली जाईल." असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयाच्या  X पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन' च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही धनदांडगे,  राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा  इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘हिट अँड रन' सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी व आमचे शासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबिंयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. "

वरळीत काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे 5.30 च्या सुमारास कारने या दाम्पत्याला धडक दिली. वरळीच्या  अॅट्रिया मॉल परिसरात ही घटना घडली. अनियंत्रित कार आपल्या दिशेने येत आहे हे दिसताच सतर्क झालेल्या पतीने कारच्या बोनेटवर उडी घेतली. मात्र महिलेला तसं शक्य झालं नाही. भरधाव कारने दोघांना धडक देत काही अंतरावर फरफटत नेलं. मात्र पती कारच्या बोनेटवर असल्याने फार दुखापत झाली नाही. अपघात झाला तेव्हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा गाडी चालवत होता. अपघातानंतर मिहीर शहाने घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेनंतर परिसरातील नागरिक या दाम्पत्याच्या मदतीला धावले. महिलेला तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांना महिलेला मृत घोषित केलं. वरळी पोलिसांनी याप्रकरणी मिहीर शहा आणि अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com