ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Autism concerns in Children: जर तुमचंही मूल दिवसभर मोबाईलमध्ये गुंतलेलं असतं, मित्रांसोबत खेळण्याऐवजी एकटंच राहायला पसंत करत असेल, हाक मारली तरी प्रतिसाद देत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण लहान मुलांमध्ये वाढत चाललेली स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम ही आता पालकांसाठी गंभीर चिंतेचा विषय बनू लागली आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या एका वर्षात तब्बल 87 स्वमग्न बालकांची आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे योग्यवेळी उपचार आणि थेरपी मिळाल्यास या मुलांमध्ये सुधारणा होऊ शकते. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारानंतर 12 मुलांमध्ये कमालीची सुधारणा झाली असून ती आता सर्वसाधारण मुलांप्रमाणे शाळेत जाऊ लागली आहेत. स्वमग्नतेची लक्षणे काय आहेत, त्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत आणि पालकांनी कोणती काळजी घ्यावी, पाहूयात या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट...
लहान मुलांमधील स्वमग्नता चिंतेचा विषय
लहान मुलांमध्ये वाढत चाललेली स्वमग्नता आता पालकांसाठी मोठ्या चिंतेचा विषय बनत आहे. पूर्वी ही समस्या अत्यंत कमी प्रमाणात दिसत होती. सुमारे २२ वर्षांपूर्वी जगात हजार मुलांमागे एक बालक ऑटिझमग्रस्त आढळत होतं. मात्र कोरोनानंतर या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे अहवाल सांगतात. सध्या ६८ मुलांमागे एक बालक स्वमग्न असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यातही गेल्या वर्षभरात तब्बल ८७ स्वमग्न बालकांची नोंद झाली आहे. अशा मुलांचे वर्तन इतर मुलांपेक्षा वेगळे असते. मित्रांसोबत खेळण्याऐवजी एकटे राहणे, हाक मारली तरी प्रतिसाद न देणे, चिडचिड करणे किंवा मोबाईल-गेममध्ये जास्त गुंतून राहणे अशी लक्षणे दिसून येतात.
ऑटिझम / स्वमग्नतेची लक्षणे
- मूल एकटेच खेळत असेल
- मित्रांमध्ये मिसळत नसेल
- हाक मारली तरी प्रतिसाद देत नसेल
- डोळ्यात डोळे मिळवून संवाद करत नसेल
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण
- नीट बोलण्यात किंवा संवादात अडथळे
- शब्द किंवा वाक्यांची वारंवार पुनरावृत्ती
- एकाच हालचाली वारंवार करणे
- चिडचिड किंवा अतिचंचलपणा
- पंजावर चालण्याची सवय
काय काळजी घ्यावी?
स्वमग्न बालकांसाठी धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र उभारण्यात आले आहे. येथे सायकॉलॉजिकल इव्हॅल्युएशन, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पेशल एज्युकेशन आणि बिहेवियर मॉडिफिकेशन अशा विविध उपचार पद्धतींचा वापर केला जातो. या उपचारांमुळे अनेक पालकांना दिलासा मिळत असून आतापर्यंत 12 मुलांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ही मुले आता सामान्य मुलांप्रमाणे वागत असून शाळेतही नियमित जाऊ लागली आहेत.
Railway Job: रेल्वेत 'लोको पायलट' कसं बनायचं? जाणून घ्या पात्रता, पगारही लाखांच्या घरात
स्वमग्नतेची नेमकी कारणे पूर्णपणे स्पष्ट नसली तरी कोरोनानंतर “व्हर्च्युअल ऑटिझम”चा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. लहान वयात मोबाईल आणि स्क्रीनचा अति वापर, पालकांचा कमी संवाद आणि वाढलेला स्क्रीन टाइम यामुळे ही समस्या वाढत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत अधिक वेळ घालवून मोबाईलचा वापर मर्यादित ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world