
मंगेश जोशी, जळगाव: राज्यभरात लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपेक्षा यावेळी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. तरुणांपासून १११ वय असलेल्या आजींपर्यंत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. अशातच जळगावमध्ये एकाच कुटुंबातील 58 सदस्यांनी मतदान केले. या फॅमिलीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान आज पार पडले. अनेक मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातल्या चुंचाळे येथील एकाच कुटुंबातील 58 सदस्यांनी एकाच वेळी मतदान केले. एकाच वेळी परिवारातील 18 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतच्या सर्व वयोगटातील 58 सदस्यांनी एकत्रित मतदान केल्याची जिल्ह्यातही चर्चा रंगली आहे.
नक्की वाचा: लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट! राजकीय राडे, मारहाणीच्या घटना, कुठे काय घडलं?
चुंचाळे येथील महाजन परिवार सधन व आदर्श शेतकरी कुटुंब असून परिवारातील ५८ मतदारांनी एकाच वेळेस चुंचाळे ता. चोपडा जि. जळगाव येथील मतदान केंद्रावर जावून १००% मतदान यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. चुंचाळे येथील महाजन परिवार निव्वळ शेतीवर अवलंबून नसून या परिवारातील अनेकजण शिक्षक असून परीवारातील तरुण इंजिनिअर, व्यावसायिक असून पुणे येथे वास्तव्य करत आहेत.
सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून एक आदर्श निर्माण केला. या परिवारातील १००% मतदान यशस्वी करण्यास शिक्षक जी. एस. महाजन (सर), श्री बी.जी. महाजन (सर) तसेच वासुदेव महाजन, राजेंद्र महाजन व जितेंद्र महाजन, अक्षय महाजन सुनील महाजन (पोलीस पाटील चुंचाळे) तेजस महाजन यांनी यशस्वी प्रयत्न करून गावात एक आदर्श निर्माण करून दिला आहे. या आदर्श कुटुंबाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
महत्वाची बातमी: राहुल गांधींना 'ते' वक्तव्य भोवणार? पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world