मुंबई: 'कधीकाळी शिवतीर्थावरुन बाळासाहेब ठाकरे विचारांचे सोने वाटायचे, आज पंतप्रधान मोदीजी विचाराचे सोने वाटत आहेत. त्यामुळे आजचा दिवस आपल्याला दसऱ्यासारखा आहे.आपल्याला २३ तारखेला दिवाळी साजरी करायची आहे, सर्वांनी फटाके तयार करुन ठेवा. लहान फटाके नाही, मोठे बाँम्ब फोडायचे आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत जोरदार फटकेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
'मराठी माणसांच्या स्वाभिमानाची लढाई लढणाऱ्या मुंबईला आणि 105 हुतात्मांना मी वंदन करतो. ज्या मैदानात बाळासाहेबांचे विचार ऐकून लाखो शिवसैनिकांच्या मैदानात अंगार फुलायचा त्याच मैदानात आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातील महायुतीचा हुंकार घुमणार आहे. या पवित्र शिवतीर्थावर विश्वनेते, विश्वगुरु पंतप्रधान मोदींचे मुंबईकरांतर्फे स्वागत. स्वाभिमान का बुलंद तारा है मोदी, दुनिया के आसमान का चमचमता तारा है मोदी..' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे खास स्टाईलमध्ये स्वागत केले.
'कधीकाळी बाळासाहेब ठाकरे विचारांचे सोने वाटायचे, आज पंतप्रधान मोदीजी विचाराचे सोने वाटत आहेत. त्यामुळे आजचा दिवस आपल्याला दसऱ्यासारखा आहे.आपल्याला २३ तारखेला दिवाळी साजरी करायची आहे, सर्वांनी फटाके तयार करुन ठेवा... मोठे बाँम्ब फोडायचे आहेत. मोदीजींचे मार्गदर्शन नेहमीच राज्य सरकारसाठी महत्वाचे आहे. म्हणूनच महाराष्ट्र आज एक नंबरला आहे. आम्ही दोन वर्षांपूर्वी विकासाच्या मोदी कार्यात सामील झालो. आम्ही जो मार्ग स्विकारला त्याची फळे आता महाराष्ट चाखताना पाहत आहे,' असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
नक्की वाचा: शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?
महाविकास आघाडीवर निशाणा..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महाविकास आघाडीचा गेम चेंज केला, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपली योजना सुपरहिट झाली आहे, लाडक्या बहिणींच्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडी कोमात गेली आहे. म्हणून म्हणतो काम केलं भारी, आता पुढची तयारी.आता आमच्या योजनेला विरोध करणारेच आमची योजना चोरायला लागलेत. पंचसुत्री नव्हे थापासुत्री आहे. महाबिघाडीने आपल्या राज्याला १० वर्ष मागे ठेवले. आता चित्र बदलले आहे. महाराष्ट्रात गती, समृद्धी, प्रगती नांदत आहे. यामागे मोठी शक्ती आहे, ती म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी.
ठाकरेंना टोला..
'२०१४च्या पुर्वीचा काळ आठवा. भ्रष्टाचार, घोटाळ्याचे रखानेच्या रखाने भरुन यायचे. आज तुम्ही मोदीजींवर आरोप करता. मात्र १० वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप डाग तुम्हाला नाही. तुम्ही दागी, मोदीजी बेदागी आहेत, हीच आमची खरी कमाई. महाराष्ट्र विकास विरोधी आणि महाराष्ट्र विकासाचे मारेकरी असलेल्या महाविकास आघाडीला जनता थारा देणार नाही. मुंबईकरांचं ठरलंय, लोकसभेतंल वारं फिरलंय. क्रांतीची नाही घराघराला आग लावणारी, जाती जातीत आग लावणारी तेढ लावणारी तुमची मशाल आहे. या जनतेच्या गळ्याभोवती आवळलेला काँग्रेसचा फास सोडवायचा आहे. त्यासाठी मुंबईतल्या ३६ च्या ३६ उमेदवारांना विजयी करा,' असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महत्वाची बातमी: कांद्याला भाव द्या! ठाकरे म्हणतात, अरे काश्मीरमधलं 370 कलम हटवलंना, सभेत काय घडलं?