
Parbhani News : माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा आज मुंबईत भाजपा पक्षप्रवेश संपन्न झाला. या पक्ष प्रवेशापासून काँग्रेसचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मात्र चार हात दूरच असल्याचे दिसून आले. यामुळे भाजपा वरिष्ठांचा काही प्रमाणात भ्रमनिरासच झाल्याचे चित्र दिसत आहे.
राज्याचे माजी राज्यमंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. परभणीहून दोनशे पेक्षा जास्त गाड्यांचा ताफा घेऊन वरपुडकर मुंबईत दाखल झाले. भाजपा कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश संपन्नही झाला. परंतु या सोहळ्यात जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय राहिला.
(नक्की वाचा- Political News: माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार? अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?)
वरपुडकर यांच्या भाजपा प्रवेशानंतर आधीच बॅकफुटवर असलेली काँग्रेस आणखीनच क्षीण होईल, असा जाणकारांचा होरा आणि भाजपा वरिष्ठांची अपेक्षा होती. मात्र हे घडल्याचे दिसून आले नाही. जिल्हा कार्यकारिणीतील बहुतांश पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व विविध सेलच्या प्रमुखांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंद केले. यामुळे आपले समर्थक असलेल्या गाव पातळीवरील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांवरच वरपुडकर यांचेसह भाजपा नेत्यांनाही समाधान मानावे लागले.
एकेकाळी परभणी जिल्हा काँग्रेस वरपुडकर- बोर्डीकरांची काँग्रेस म्हणून ओळखल्या जायची. हे दोघे काँग्रेसचे चालक - मालक होते. तेव्हा काँग्रेसमध्ये वरपुडकर-बोर्डीकर गट कार्यरत असायचे. कालांतराने बोर्डीकरांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या रूपाने भाजपाला जिल्ह्यात ‘मास लीडर' मिळाला. भाजपानेही दुसऱ्यांदा विजय मिळवणाऱ्या मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्री केले. जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन बोर्डीकरांची शक्ती वाढवली.
(नक्की वाचा- Viral VIDEO: "साहेब 15 वर्ष झाले, आता गाडी बदला"; माजी मुख्यमंत्र्यांना चाहत्याचा सल्ला, नव्या गाडीचं नावही सांगितलं)
मंत्री, पालकमंत्री पद दिल्यानंतर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची परीक्षा देण्याआधीच भाजपाने वरपुडकर यांना पक्षात घेऊन बोर्डीकर यांचे हात अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाला एकीचे फळ मिळणार की गटबाजी निर्माण होऊन भाजपाची काँग्रेस होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.