
Ajit Pawar Anjana Krishna Row: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna Video) यांना फोनवरुन कारवाई रोखण्याचे आदेश दिले होते. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून यानंतर अजित पवारांवर टीका केली जात होती. अखेर अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्यच असल्याचं समोर आलं आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे विरोधकांकडून पुन्हा एकदा अजित पवार निशाण्यावर आले आहेत.
ती कारवाई योग्यचं...
सोलापूरच्या कुई येथे सुरू असलेला मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.येथे डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. बेकायदा उत्खनन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आधीच दिल्या असून सविस्तर अहवाल तहसीलदारांना सादर करण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी सोमवारी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोन प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाने स्पष्ट केले की, संबंधित काम बेकायदेशीर आहे. त्यामुळे कारवाई थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
नक्की वाचा - NCP Leader : अजित पवारांच्या वादातील नेत्याचा धक्कादायक Video Viral, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
काय आहे प्रकरण?
माढ्याच्या कुर्डू गावात अवैध उत्खननाची तक्रार आली. यानंतर डीएसपी अंजना कृष्णा टीमसोबत घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनी मुरुमाचं उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. यावेळी उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला. उत्खनन करणारे लाठ्या काठ्या घेऊन आले. अधिकाऱ्यांना दमदाटी केली. पण अंजना कृष्णा मागे हटल्या नाहीत. त्या कारवाईवर ठाम राहिल्या. आता अधिकारी मागे हटत नाही म्हटल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबा जगताप याने तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. त्याने डीएसपी अंजना कृष्णा यांच्याकडे फोन दिला. यावेळी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण अंजना कृष्णा यांनी फोनवरून कोण बोलतंय हे मला कसं कळणार असा उलट सवाल केला. मग काय अजित पवारांच्या रागाचा पारा चढला. इतकी डेअरींग आहे का तुमची. कारवाई थांबवा असं अजित पवार म्हणाले. पण अंजना काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या. आता अंजना कृष्णा ऐकत नाही म्हटल्यावर, अजित पवारांना त्यांच्या नंबरवर कॉल करून बोलणं करावं लागलं. तेव्हा कुठे कारवाई थांबली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world