
मनोज सातवी, पालघर: राज्यभरात आज मराठी नववर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या सणाचा उत्साह अन् जल्लोष पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज पाडवा मेळाव्यातून राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, त्याआधी मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु असतानाच पालघर मनसेमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पालघरमध्ये मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे.
पालघरच्या बोईसरमधील ओसवाल परिसर, मुकुट पेट्रोल पंप लागलेल्या बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आले आहे. पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनीच अविनाश जाधव यांच्या फोटोला काळे फासल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच अंतर्गत वादातून अविनाश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्कालीन मनसेचे माजी पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचा भाऊ अतीश मोरे यांना मारहाण केली होती.
त्यानंतर दोघांनीही मनसेला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला होता. अशातच आता अविनाश जाधव यांच्या फोटोला काळे फासल्याने नवा वाद उभा राहिला आहे. दरम्यान, आजच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ, औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरु आहे. यावरुन राज ठाकरे काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आजच्या पाडवा मेळाव्याआधी मनसेकडून शिवसेना भवनाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनर्सनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. शिवसेना भवन बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टायगर अभी जिंदा है अशा आशियाचं बॅनर लावण्यात आले आहे. गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून या परिसरामध्ये मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी लावण्यात आलेलं हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेते. विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश न मिळू शकल्याने ठाकरे गटाकडून राज ठाकरेंवर अनेकदा टीका केली गेली आणि याच टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून केला जातोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world