
प्रांजल कुलकर्णी
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे त्यांच्या पक्षात नाराज होते. बडगुजर हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेऐवजी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना उबाठा पक्षाला बडगुजर यांच्या मनसुब्यांबद्दल माहिती मिळताच त्यांनी बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षातील बडतर्फीनंतर बडगुजर हे भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र त्याचवेळी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्याविरोधात रणशिंग फुंकले.
नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांनी एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल केली आहे. ज्यामध्ये तीन कुत्रे दाखवण्यात आले आहे. या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे '2 टॉमी एक मामी' ही पोस्ट सीमा हिरे आणि त्यांच्या समर्थकांना उद्देशून केल्याचा आरोप सीमा हिरे यांच्या समर्थकांनी केला आहे. सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये येणार हे कळताच सीमा हिरे आणि त्यांच्या समर्थकांची भीतीने गाळण उडाली असे दाखवण्यासाठी ही पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. सीमा हिरे यांच्या कार्यकर्त्यांनी या पोस्टबद्दल अंकुश शेवाळे, गणेश दराडे आणि धीरज राजपूत या तीन बडगुजर समर्थकांविरोधात अंबड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
हिरे-बडगुजर वाद
सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. निवडणुकीच्या प्रचारात बडगुजर यांनी आपल्याविरोधात विखारी प्रचार केल्याचा सीमा हिरे यांनी आरोप केला आहे. इतकंच नाही तर याच बडगुजर यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांविरोधात आरोपांची राळ उठवली होती याची आठवणही हिरेंनी करून दिली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बडगुजर यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे काही फोटो प्रसिद्ध केले होते. चंद्रशेखर बावनकुळे परदेशात कॅसिनो खेळत असल्याचे ते फोटो होते. हिरे यांनी बडगुजरांवर आरोप करताना म्हटले की, भाजप नेते नारायण राणे यांना जेवण करताना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणातील तक्रारदार हे सुधाकर बडगुजर होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबतचा बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बडगुजरांच्या मुलाने एकावर गोळीबार केला. त्यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे लपवण्यासाठी भाजपामध्ये येत असतील, असा आरोप हिरे यांनी केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world