जाहिरात
1 minute ago

आज देशभरात दसऱ्याचा उत्साह आहे. आज राज्यातील पाच महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे याशिवाय आज संघाचा दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यांमध्ये मराठवाड्यातील दोन महत्त्वाचे दसरा मेळावे देखील चर्चेचा विषय ठरणार आहे.बीड जिल्ह्यात  श्रीक्षेत्र नारायणगड आणि पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील भगवान भक्तिगड या दोन ठिकाणी दसरा मेळावे होत आहेत. नारायणगडावर 350 एकरांत होणाऱ्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील हे संबोधित करतील, तर सावरगाव येथे सुमारे 20 एकरांत होणाऱ्या मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे या संबोधित करतील. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या हे दोन्ही मिळावे महत्त्वाचे समजले जात आहे. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या मेळाव्यांमध्ये दोन्ही नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 
 

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी रावण दहन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील  आयपी एक्स्टेंशन इथं रामलीला समिती आयोजित विजयादशमीच्या रावण दहनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी होणाऱ्या या रावण दहन सोहळ्यात ६ वाजता पूर्व दिल्लीतील पटपडगंज परिसरात असलेल्या या ठिकाणी पोहोचतील आणि पारंपरिक रावण दहन समारंभात सहभागी होतील.

मागील वर्षी, मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मैदानावरील लव-कुश रामलीला कार्यक्रमाला हजेरी लावली होती, तिथं त्यांनी प्रतीकात्मक बाण सोडून रावण दहन केलं होतं.

२०२३ मध्ये, पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील द्वारका येथील डीडीए मैदानावरील विजयादशमी सणात सहभागी झाले होते, तिथं मोदी यांनी लोकांना दहा प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले होते, ज्यामध्ये किमान एक गरजू कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं होतं. 

त्यामुळे रावण दहनाच्या कार्यक्रमात मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल..

Live Update : पिंजर घरफोडी आरोपी अटक, सोन्याचा मुद्देमाल जप्त

अकोला पिंजर पोलीस स्टेशनने घरफोडीचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. तक्रारदार अनुराधा महल्ले यांच्या घरातून 13,600 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. तपासादरम्यान सुनील श्रीकृष्ण काकड (वय 45, दताळा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 5 ग्रॅम सोन्याची पोत, 3 ग्रॅम सोन्याचा गोप, चांदीचे करंडे व देव, 2 मोबाईल आणि चोरीची मोटरसायकल असा एकूण 58,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांच्या टीमने केली.

Live Update : बंजारा समाजाचा आज पोहरादेवी दसरा मेळावा, पोहरादेवीतून ठरणार बंजारा समाजाच्या आंदोलनाची रूपरेषा

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे आज प्रथमतः दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला बंजारा समाजातील हजारो बांधव उपस्थित राहणार असून, समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या प्रमुख मागणीवर या मेळाव्यातून चर्चा होणार आहे. दसऱ्याच्या या मेळाव्यातून समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा व ठोस आंदोलनात्मक रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.यावेळी बंजारा समाजातील महंत,धर्मगुरू सह राज्यातील जानकर येणार आहेत जवळपास तीन हजार लोकांचा हा मेळावा असणार आहेत.बंजारा समाजातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन पुढील संघर्षाची रणनिती आखणार आहेत.

Live Update : कर्जत येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवाला सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती

कर्जत येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन उत्सव आणि संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या पारंपरिक कार्यक्रमात स्वयंसेवकांनी गणवेशात शिस्तबद्ध संचलन केले. शस्त्रपूजन विधी पार पडल्यानंतर देशभक्तीपर वातावरणात घोषणाबाजी, परंपरा आणि सांघिक शिस्तीचे दर्शन घडले.

कार्यक्रमात बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ संघटना नसून राष्ट्रीय संस्कार घडवणारी आणि देशभक्तीची भावना रुजवणारी जीवनशैली आहे. अशा संघटित व सशक्त कार्यातूनच समाजजीवनात सकारात्मक बदल घडतात.”

या प्रसंगी स्थानिक स्वयंसेवक, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी प्रा. शिंदे यांचे मनापासून स्वागत केले.

Live Update : इथे रावण दहन नाही तर होत असते रावणाची पूजा, मंदिरात रावणाच्या मूर्तीसमोर होतात सारेच नतमस्तक....

दसरा या सणाला जागो जागी रावणाचा पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा आहे परंतू भारतात काही अशी मोजकी ठिकाणे आहेत जिथे रावणाला आपला पूर्वज मानून देवासारखी त्याची पूजा करण्यात येते. असेच एक ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी अतिदुर्गम बहुल भागातील असून हे गाव परसवाडी या नावाने ओळखले जाते. येथे रावणाचे मंदिर बांधण्यात आले असून मागील ३५ ते ४० वर्षांपासून येथे रावणाच्या आराधनेची परंपरा अव्याहत सुरू असून दसऱ्याच्या दिवशी मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात 

Live Update : आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दसऱ्याचा उत्साह

आज विजयादशमीनिमित्त देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आई तुळजाभवानी ला सिंहासन सोडून बाहेर आणण्यात आलं. त्यानंतर बुऱ्हाणनगर येथून आणलेल्या मानाच्या पालखीतून मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. या सोहळ्यानंतर देवीला पौर्णिमेपर्यंत पाच दिवसाची श्रम निद्रा देण्यात आली आहे.  देवीच माहेर असलेल्या बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबीयांकड मागील हजारो वर्षांपासून देवीच्या सीमोल्लंघन सोहळ्यासाठी पालखी आणण्याचा मान आहे. हे कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून अखंडपणे देवीची सेवा बजावत आहे.

Live Update : दसऱ्यानिमित्त दीड टन फुलांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सजले

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसऱ्यानिमित्त आज पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. यासाठी तब्बल दीड टन फुलांचा वापर करण्यात आला. झेंडू , शेवंती, गुलाब , अष्टर , ऑर्चिड अशा वेगवेगळ्या फुलांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे. ही सजावट पुणे येथील भाविका राम जांभुळकर यांनी सेवाभावी तत्त्वावर विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com