
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. 2024 उजाडेपर्यंत या घडामोडी घडत होत्या आणि अजूनही घडत आहेत. फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय परिस्थितीचा अंदाज बांधणे काही मतदारसंघांमध्ये कठीण झाले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास उत्तर पश्चिम मुंबई ( Mumbai North West ) या मतदारसंघाचे देता येईल. विधीज्ञ राम जेठमलानी, सुनील दत्त, गुरुदास कामत या सारख्या दिवंगत नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.वडील सुनील दत्त आणि त्यांची मुलगी प्रिया दत्त या दोघांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले असून एकाच मतदारसंघातून, पिता-पुत्रीने खासदार म्हणून निवडून आल्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत. हा मतदारसंघ सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे फार रंजक बनला आहे आणि इथली लढत ही संपूर्ण देशातील प्रमुख लढतींपैकी एक ठरणारी असणार आहे, कशी ते पाहूया. वडील सुनील दत्त आणि त्यांची मुलगी प्रिया दत्त या दोघांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले असून एकाच मतदारसंघातून, पिता-पुत्रीने खासदार म्हणून निवडून आल्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत. हा मतदारसंघ सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे फार रंजक बनला आहे आणि इथली लढत ही संपूर्ण देशातील प्रमुख लढतींपैकी एक ठरणारी असणार आहे, कशी ते पाहूया.
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तीकर हे सलग दोनवेळा निवडून आले. 2014 ची निवडणूक ही चौरंगी मुकाबला असणारी आणि देशाचे लक्ष लागलेली निवडणूक होती. त्या निवडणुकीत कीर्तीकरांसमोर काँग्रेसच्या गुरुदास कामत, मनसेच्या महेश मांजरेकर आणि आपच्या मयंक गांधी यांचे आव्हान होते. 2014 साली कीर्तीकरांनी गुरुदास कामतांचा 1,83,028 मतांनी पराभव केला होता. महेश मांजरेकरांचा पराभव हा देखील त्यावेळी चर्चेचा विषय बनला होता. 1984 साली या मतदारसंघातून सुनील दत्त काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. 1996 साली शिवसेनेचे मधुकर सरपोतदार या मतदारसंघातून निवडून आले होते. हा अपवाद वगळला तर 2009 सालच्या निवडणुकीत विजयी झालेल्या गुरुदास कामतांपर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसने आपल्या ताब्यात ठेवला होता. हा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांत या मतदारसंघात कधीही निर्माण झाली नव्हती अशी परिस्थिती 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत तयार होताना दिसत आहे.
या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य असले तरी उद्धव ठाकरे यांचा पक्ष या मतदारसंघासाठी प्रचंड आग्रही आहे. कारण कीर्तीकर शिवसेना एकसंध असताना इथून विजयी झाले होते आणि त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा सलग 2 निवडणुकांत पराभव केला होता. या विजयामागची खरी ताकद ही आपली असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने म्हटले आहे. सत्ताधारी युतीमध्ये जागा वाटपाबाबतच्या चर्चांमध्ये हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भाजप आग्रही आहे. गजानन कीर्तीकर हे 80 वर्षांचे झाले असून ते पुन्हा निवडणूक लढण्याची शक्यता ही कमी आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही संभाव्य परिस्थिती खरी ठरली तर खरी गंमत सुरू होणार आहे. अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपली संपूर्ण ताकद पणाला लावेल. हा मतदारसंघ आपल्या वाट्याला न आल्याने गजानन कीर्तीकर हे भाजपच्या उमेदवाराचा जाहीर प्रचार करतील मात्र छुपी मदत ही त्यांच्या मुलाला करतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आतापर्यंत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला कधीही आला नव्हता. असं असलं तरी या मतदारसंघात मोडणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीवर नजर टाकल्यास 6 मध्ये भाजपचे 3 आणि शिवसेनेचेही 3 आमदार निवडून आलेले आहेत. जोगेश्वरी पूर्वेतून रवींद्र वायकर, दिंडोशीतून सुनील प्रभू, अंधेरी पूर्वतून ऋतुजा लटके निवडून आले आहेत. हे तिघेही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार आहेत. गोरेगावातून विद्या ठाकूर, वर्सोवातून भारती लवेकर, अंधेरी पश्चिमेतून अमित साटम हे विजयी झाले होते आणि हे तिघे भाजप आमदार आहेत. त्यामुळे वरवर पाहाता ही लढाई अटीतटीची दिसत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होणारी बहुतांश पक्षांमध्ये होणारी बंडखोरी ही इथली गणिते आणखी चक्रावणारी करेल. भाजपतर्फे आमदार विद्या ठाकूर यांचे पती जयप्रकाश ठाकूर आणि आमदार अमित साटम यांच्या नावाची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातर्फे अमोल कीर्तीकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे कळते आहे. भाजपने या मतदारसंघात आपली ताकद लावली असून भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी या मतदारसंघासाठी एक बैठकही घेतली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world