सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळला कोसळला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी याप्रकरणी या दुर्घटनेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व इतर अधिकाऱ्यांवर पोलीस फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विनायक राऊत यांनी पत्रात काय लिहिलंय?
विनायक राऊत यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं की, "या दुर्घटनेत शिवरायांच्या अवमानास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व इतर अधिकाऱ्यांवर पोलीस फौजदारी कारवाई करावी. काही महिन्यांपूर्वी नेव्ही डेच्या निमित्ताने 04 डिसेंबर 2024 रोजी सर्जेकोट, तालुका मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले."
(नक्की वाचा- सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; अवघ्या 8 महिन्यांपूर्वी झालं होतं लोकार्पण)
"शिवरायांचे स्मारक उभारताना ज्या प्रतीकात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता होती, त्याकडे पूर्ण डोळेझाक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर स्वतःचा टेंबा मिरवण्यासाठी घाई गडबडीने निकृष्ट दर्जाचे काम करून शिवरायांचा पुतळा उभा केला गेला. करोडो - करोडो रुपयांची उधळपट्टी शिवरायांच्या नावावर करून ज्यांनी स्वतःची तुंबडी भरली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुरावस्था झाली त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्याचे भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध पोलीस फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे", अशी मागणी विनायक राऊत यांनी केली. "
(नक्की वाचा - नगरसेवक ते खासदार; एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय, वसंत चव्हाणांनी कठीण काळात काँग्रेसला जिंकवलं!)
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान निसर्ग निर्मित किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेला नसून तो महाराष्ट्र शासन निर्मितीतच आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पोलीस कारवाई करा आणि जेष्ठ तज्ञ मंडळींची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण केंद्रीय गृहमंत्री यांना द्यावेत", अशी विनंती विनायक राऊत यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world