संजय तिवारी, प्रतिनिधी
'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,' एखाद्या विदारक परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी सुरेश भट यांच्या कवितेमधील या प्रसिद्ध ओळीचा हमखास आधार घेतला जातो. विदर्भातल्या एका गावातील नागरिकांची तर मृत्यूनंतरही सूटका नाही. या गावातील नागरिकांना दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीमधून अंत्ययात्रा काढावी लागते. जगण्या-मरण्याशी संबंधित असलेला हा त्रास कधी कमी होणार? असा सवाल नागरिक करत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे परिस्थिती?
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा गावाचे नाव कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे चर्चेत असते. या गावाला मागासलेपणाचा शाप लागलाय. त्याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. ग्रामपंचायतीचा निष्काळजी कारभार आणि आमदारांना स्वत:च्याच आश्वासनांचा पडलेला विसर यामुळे येथे आजही नदीच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या स्मशानभूमीमध्ये जाण्यास रस्ता नाही. हा पूल नसल्यानं गावात एखादा मृत्यू झाला तर गावकऱ्यांना अंत्ययात्रा नदीच्या पाण्यातूनच न्यावी लागते.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अशोक उईके यांनी पूल तातडीनं करुन देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण, तो पूल प्रत्यक्षात झालाच नाही. नदीला पूर आला की मृतदेह घरी ठेऊन पूर ओसरण्याची वाट बघावी लागते. कंबरेभर पूरातून अंत्ययात्रा न्यावी लागते. या प्रकारामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनानं वेळीच दखल घेऊन न बोट, पुराच्या वेळी नदी ओलांडण्यास प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा रक्षक तसेच पात्रात कुणी बुडू लागल्यास सुरक्षा पथक तैनात करणे गरजेचं आहे.
( नक्की वाचा : IAS पूजा खेडकरांना दणका, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली मोठी कारवाई )
काय म्हणाले आमदार?
राळेगाव मतदार संघातील भाजप आमदार डॉ अशोक उईके यांना 'NDTV मराठी' नं संपर्क साधला. त्यांनी या विषयावरील प्रस्ताव मी स्वतः आमदार निधीतून मंजूर करून घेतला असून पावसाळा थांबला की दोन महिन्यात पूल होईल असं आश्वासन दिलं.