
मनिष रक्षमवार, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अहेरी तालुक्यातील सिंगनपेठ येथे होणारी अवैध दारूविक्री थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी एक धाडसी आणि अनोखा निर्णय घेतला आहे. गावसभेच्या ठरावाचे उल्लंघन करून अवैध दारूविक्री करणाऱ्याला आता कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार नाही. तसेच त्याच्या कार्यक्रमांना ग्रामस्थ जाणार नाहीत, असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला असून सर्वत्र या निर्णयाचे स्वागत केल्या जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिंगनपेठ वगळता शेजारच्या गावांमध्ये दारू विक्री बंद असल्याने, इतर गावातील मद्यपी दुचाकी घेऊन सिंगनपेठेत दारू पिण्यासाठी येतात. दारूच्या नशेत दुचाकी चालवल्याने रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वाढली आहे. गावात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले असून, त्यामुळे घरांमध्ये भांडणे वाढली आहेत आणि महिला त्रस्त झाल्या आहेत.
अशा परिस्थितीत, मुक्तिपथ आणि गाव संघटनेच्या वतीने आयोजित ‘सघन भेटी'दरम्यान गावातील सर्व लोकांना एकत्र बोलावून एक महत्त्वपूर्ण ग्रामसभा घेण्यात आली.
( नक्की वाचा : Pune Palkhi 2025: पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, वाचा सर्व अपडेट सविस्तर )
गावातील पोलीस पाटील मीना वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेला दारूविक्रेत्यांनाही बोलावण्यात आले होते. यावेळी अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून, गावाच्या हितासाठी दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. या ठरावानुसार, जे कोणी गावात दारू विक्री करतील, त्यांना १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
याव्यतिरिक्त, दारूविक्रेत्यांना गावातील कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात बोलवले जाणार नाही आणि ग्रामस्थ त्यांच्या कार्यक्रमांना जाणार नाहीत, असेही ठरवण्यात आले. इतकेच नव्हे, तर अशा विक्रेत्यांचे रेशन बंद करण्यात येईल आणि गावातील कोणीही त्यांच्याशी बोलणार नाही, असे कठोर निर्णयही या सभेत घेण्यात आले.
Satara: महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी 19 ऑगस्टपर्यंत बंद, सातारा जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
यावेळी गाव प्रमुख सतीश निखाडे, मुक्तिपथचे नंदिनी आशा, नितीन पोटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंगनपेठ ग्रामस्थांच्या या धाडसी निर्णयामुळे अवैध दारूविक्रीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world