
Maharashtra Congress Chief Harshavardhan Sapkal EXCLUSIVE: राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्रात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे आगामी काळात नव्याने पक्षबांधणी करण्याचे आणि बलाढ्य भारतीय जनता पक्षाला शह देण्याचे मोठे आव्हान नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर असेल. राज्यामध्ये खिळखिळी झालेल्या काँग्रेसला कशी नवसंजीवनी देणार? काय असेल नवा संकल्प आणि ध्येय..याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी काळातील रणनितीवर चर्चा केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
'आपल्या लोकशाहीमध्ये आपल्याला झुंडशाही निर्माण करायची नाही. जातीचे धर्माचे राजकारण करणारी झुंडशाही थांबवण्यासाठी मानवजातीने एकत्र यावे. या झुंडशाहीविरोधात लढा देण्याचे मी फार पूर्वीच ठरवले आहे.पक्षश्रेष्ठींच्या बाबतीत राहुल गांधींची हीच अपेक्षा आहे की काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्यावे,' असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
'माझी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली?याचा अजिबात धक्का बसला नाही. मी सुद्धा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, असा आत्मविश्वास होता. याची चाहूल मला आठवडाभरापूर्वीच लागली होती. असे म्हणत माझ्याऐवजी कोणीही प्रदेशाध्यक्ष झाले असते तरी तितकीच चांगली कामगिरी केली असती. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्हायला कोणीही तयार नव्हते, हे खोटं आहे..' असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
पक्षाची पुढील रणनिती काय?
'मी एक हार्डकोअर कार्यकर्ता आहे. तळागाळापासून काम केले आहे. सर्वांना सोबत घेऊन चाललं, कोणाच्याही गटातटाच्या राजकारणात न पडता पुढे जाणं या माझ्या जमेच्या बाजू आहेत. पक्ष संघटनेमध्ये निष्ठेवर काम झाले पाहिजे. मी पक्षातील सर्वांपेक्षा ज्युनियर आहे. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत, असे म्हणत मी आगामी काळातील मुख्यमंत्री नाही, यामधीलच एकाला मुख्यमंत्री करणे माझा हा संकल्प आहे. मला पुढील काळात कोणतेही पद नको आहे. पक्ष संघटना मजबूत करणे आणि वैचारिक लढाई लढणे हीच माझी भूमिका आहे..' असेही हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले.
"पक्षामध्ये आलेली मरगळ कशी झटकता येईल? आंदोलने, नव्या नियुक्त्यांच्या माध्यमातून संघटनेत बदल कसे केले जातील. ही माझ्या समोरची खरी आव्हाने आहेत. जिथे जिथे आवश्यकता आहे, तिथे बदल केले जातील. पक्षातील नेते गटबाजी विसरुन मला साथ देतील, असे म्हणत मी फटकळ आहे आणि तोंडावर बोलतो. स्पष्ट बोलणे हा माझा बाणा राहिला आहे, म्हणूनच माझा वेग कमी असेल.. याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world