
बूम-परांडा विधानसभा मतदार संघ हा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मतदार संघ आहे. या मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे दंड धोपटून उभे आहेत. तर वंचितचे सूर्यकांत उर्फ सुरेश कांबळे हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सावंत यांना त्याच्या मतदार संघातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देता आले नव्हते. तब्बल 81 हजार मताधिक्याने महायुतीचा उमेदवार पिछाडीवर होता. ही सावंत यांच्यासाठी धोक्याची घंटा समजली जाते. त्यामुळे या निवडणुकीत सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे हे सलग तीन वेळा परांडा विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. त्यांची या मतदार संघावर चांगली पकड होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोटे यांच्या वर्चस्वाला शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी धक्का दिला. मोटे यांचा जवळपास 32 हजार मतांनी पराभव केला होता. त्यावेळी डॉक्टर तानाजी सावंत यांना 1 लाख 06 हजार 634 मते मिळाली होती. तर राहुल मोटे यांना 73 हजार 700 मते मिळाली होती. वंचितच्या उमेदवारानेही तब्बल 27 हजार 939 मते मिळाली होती. त्यामुळे सावंत यांचा विजय सुकर झाला होता.
ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार
2024 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीकडून डॉक्टर तानाजी सावंत यांची उमेदवारी ही पक्की मानली जाते. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सावंत यांनी ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिली. त्याचे बक्षिस म्हणून सावंत यांना मंत्री करण्यात आले. त्यामुळे तेच या मतदार संघात महायुतीचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. तर महाविकास आघाडी कडून माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, प्रतापसिंह पाटील त्याच बरोबर शंकरराव बोरकर हे इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा कोणाच्या पारड्यात जाणार यावर इथली उमेदवारी कोणाला हे निश्चित होणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - राजुरा विधानसभेत तिरंगी लढतीत कोणाचा फायदा? धोटे -चटप लढत रंगणार?
भारतीय जनता पार्टीकडून ही या मतदार संघात चाचपणी केली जात आहे. विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्या नावाची चर्चा या मतदार संघात आहे. तर शिवसेना ठाकरे गटातही ही जागा मिळावी यासाठी रस्सीखेच सुरू आहे. 2009 मध्ये अल्पशा मताने पराभूत झालेले शिवसेनेचे संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, शिवसेना परांडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे यांच्या नावाची चर्चाही सुरू आहे.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
2019 विधानसभा निवडणुकीत 26 हजारापेक्षा जास्त मते मिळून आपली स्वतःची ताकद ज्यांनी दाखवून दिलेले सूर्यकांत उर्फ सुरेश कांबळे हे यावेळीही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या शिवाय वंचितकडूनच प्रवीण बागुल यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी भूम परांड्यात सभाही घेतली होती. तर वाशीचे प्रशांत चिडे यांनीही निवडणुकीमध्ये उतरवण्याची जोरदार तयारी केली आहे. या मतदार संघात मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देणार की नाही याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. इथं जरांगे उमेदवार देण्याचे निश्चित झाल्यास जरांगेंकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world