
शुभम बायस्कार, अमरावती
अमरावती शहरात हिट अँड रनची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरधाव बोलेरो कारने दोन युवतींना उडवल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर कारचालक फरार झाला असून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी दर्शन करून पायल राजेंद्र बुंदेले (वय 22 वर्ष) व तिची मैत्रीण वैष्णवी विष्णू थोरात (वय 21 वर्ष) ह्या घरी जात होत्या. दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कंवरनगर भागात मागून येणाऱ्या भरधाव पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
यातील वैष्णवी विष्णू थोरात हिची प्रकृती अत्यवस्थ असून अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर पायलची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर बोलेरो कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कार चालकाचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस माहिती आली नसल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारमधील आरोपी हे मद्यधुंद अवस्थेत होते. कवरनगर भागासह इतर भागातही त्यांनी भरधाव वाहन चालवत काही ठिकाणी अपघात केल्याचाही माहिती आता पुढे येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world