
ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Hotel Bhagyashree News: धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळी कारण अत्यंत गंभीर आहे. हॉटेलचे मालक नागेश मडके यांचे अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला दोन दिवस उलटले असतानाही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही, असा थेट आरोप नागेश मडके यांनी 'NDTV मराठी'शी बोलताना केला आहे.
मडके यांनी काय सांगितलं?
नागेश मडके यांनी यावेळी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, हल्ला करणाऱ्या युवकांचे हॉटेल मध्ये प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. या फुटेजमध्ये हे युवक हॉटेलमध्ये प्रवेश करताना स्पष्ट दिसतात. त्यानंतर त्यांनी मडके यांना जबरदस्तीनं कारमध्ये टाकले. अत्यंत वेगानं कार चालवत 5 किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर सिद्धेश्वर वडगाव येथील पुलावरून फेकून दिले, मात्र यावेळी पुलाच्या बाजूला कठडा असल्याने मी खाली पडलो नाही
या बाबत आपली पत्नी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेली होती. मात्र पोलिसांनी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मडके यांनी केलाय. तसंच या प्रकरणात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
( नक्की वाचा : Hotel Bhagyashree News: खळबळजनक! 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाचे अपहरण, बेदम मारलं अन् पुलावरुन फेकलं )
घटनेच्या सत्यतेबाबत प्रश्न
मडके यांनी अपहरणाचा दावा केलाय. पण, त्यांनी सांगितलेल्या घटनेच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण, या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांनी मौन साधलंय. पोलीस संपूर्ण तपास केल्याशिवाय अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत.
मडके यांनी समोर आणलेल्या सीसीटीव्हीत केवळ आरोपींचे हॉटेल मध्ये प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहेत बाहेर जाताना का नाहीत? तसेच मडके सांगत असल्याप्रमाणे खरच 140 किमी प्रतितास गाडीचा वेग असेल तर जेवढी गंभीर जखमा शरीरावर का नाहीत? हॉटेलमध्ये कायम गर्दी असते. खुद्द नागेश यांच्याकडे 3 खासगी सुरक्षा रक्षक आहेत. या सर्वांच्यासमोर अपहरणकर्ते नागेशला कसं नेऊ शकले? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्यामुळे हे सर्व अपहरण खरंच झाले होते की हा सर्व मडके यांचा पब्लिसिटी स्टंट होता? अशी चर्चा आता सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world