
देवा राखुंडे, इंदापूर: पुण्याच्या इंदापूर शहरात आज सकाळपासून जवळपास 10 हून अधिक नागरिकांना एका कुत्र्याने चावा घेतला, त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या नागरिकांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक लसीकरण देखील करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर जखमेत दिली जाणारी अँटी रेबीज सिरम ही लसच गेल्या चार महिन्यापासून इंदापूर जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आले आहे.
राज्याच्या कृषिमंत्र्याच्या तालुक्यातच पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर आवश्यक असणारी जखमेत देण्याची अँटी रेबीज सिरम ही लस गेल्या चार महिन्यांपासून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध नसल्यामुळे इंदापूरमध्ये आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचं समोर आलं आहे. याबाबत कृषीमंत्री आगामी काळात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेनंतर जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ.यमपल्ले यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर त्या जखमेत दिली जाणारी लस उपलब्ध नसल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी राज्यस्तरावरूनच ही लस उपलब्ध नसल्याने संबंधित स्थानिक रुग्णालयांना आवश्यकतेनुसार लस खरेदी करण्याचे अधिकार दिलेले आहेत अशी माहिती दिली. तर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नामपल्ली यांनी मात्र यांनी मात्र स्थानिक पातळीवर खरेदी केलेल्या औषधांची बिले वरिष्ठ स्तरावरून वेळेवर मिळत नसल्याने आम्ही खरेदी करणे टाळतो अशी माहिती दिली.
मागील वर्षी बारामती मधून आम्ही अँटी रेबीज सिरम लस खरेदी केली होती त्याची बिले अद्याप मिळाली नाहीत.याशिवाय पालखी काळात देखील काही अत्यावश्यक औषधे खरेदी करण्यात आली होती, त्याचीही अर्धी बिले मिळाली तर अर्धी मिळाली नाहीत. त्यामुळे ज्याची बिले आहेत त्यांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न आम्हाला पडलेला असल्याने आम्ही सध्या तरी बाहेरून औषधांची खरेदी करणे टाळत असल्याचं म्हटलं आहे. या कारणास्तव इंदापूर मधून आवश्यक त्या रुग्णांना बारामती किंवा खाजगी ठिकाणी पाठवले जात आहे असा खुलासा नामपल्ले यांनी भ्रमणध्वनीवरून केला आहे.
Fastag Annual Pass : ज्या टोल नाक्यांवर वार्षिक पास चालणार नाही, तिथे काय? प्रवास करण्याआधी हे वाचा
इंदापूर मधील आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा पाहता इंदापूरचे लोकप्रतिनिधी असल्याने राज्यात कृषिमंत्री पद भूषवत असल्याने आरोग्यवस्थेला सलाईन देणार का ? नागरिकांना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान या घटनेची माहिती इंदापूर नगरपरिषद प्रशासनास मिळताच या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
यापुढे देखील मोकाट कुत्र्यांना पकडण्याची कारवाई करत आहोत.जे खाजगी श्वानधारक आहेत त्यांनी आपले श्वान रस्त्यावर मोकाट सोडू नयेत यासाठी त्यांनाही नगरपरिषदेमार्फत नोटीस दिली जात आहे. मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषदेकडे निविदा झाली असून ही कारवाई सतत चालू आहे अशी प्रतिक्रिया इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world