
मंगेश जोशी
जळगाव जिल्ह्यात खासदार निधीतून घेण्यात आलेल्या 16 रुग्णवाहिका 12 वर्षांपासून बेपत्ता झाल्या आहेत. ज्या संस्थांना या रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या त्या संस्थाही गायब असल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारात समोर आला आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णवाहिका जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावे असल्याची माहिती देखील समोर आली आहे. जळगाव मधील वकील हरिहर पाटील यांनी माहितीच्या अधिकाऱ्याखाली हा संपूर्ण प्रकार उघड केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे बेपत्ता रुग्णवाहिकेचे गूढ?
सन 2012 - 2013 मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार ए.टी.नाना पाटील यांच्या खासदार निधीतून 7 तर रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांच्या खासदार निधीतून 9 अशा एकूण 16 रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या. शिफारशीनुसार या रुग्णवाहिकांचे सेवाभावी संस्थांना वाटप करण्यात आले होते. या सर्व 16 रुग्णवाहिकांचा विमा व फिटनेस सर्टिफिकेट हे रुग्णवाहिका खरेदी केल्यानंतर परिवहन विभागाकडे नोंदणी करताना काढले होते. मात्र त्यानंतर 12 वर्षात या रुग्णवाहिकांचा ना विमा काढण्यात आला ना फिटनेस सर्टिफिकेट. एवढेच नाही तर साधी पीयूसीची देखील या रुग्णवाहिकांची कुठेही नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्या संस्थांनी या रुग्णवाहिकेसाठी शिफारसी केल्या होत्या त्या संस्थांची नावे व रुग्णवाहिका क्रमांक याची माहिती हरिहर पाटील यांनी समोर आणली आहे.
चौकशीत संस्था व रुग्णवाहिका दोन्हीही बेपत्ता
वकील हरिहर पाटील यांनी माहितीच्या अधिकारात रुग्णवाहिका व संस्थांबाबत 20 ऑगस्ट 2023 ला जिल्हाशल्य चिकित्सक व परिवहन विभागाकडे अर्ज केला होता. या अर्जानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी 20 ऑगस्ट 2023 रोजी रुग्णवाहिका देण्यात आलेल्या संस्थांना पत्र पाठवली. तर या प्रकरणात जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनीही 4 अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या रुग्णवाहिकांची चौकशी केली. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक व परिवहन विभागाला संस्था व रुग्णवाहिका या आढळून आल्या नसल्याचे हरिहर पाटील यांनी म्हटले आहे.
रुग्णवाहिकांचा अवैध कामांसाठी वापर?
खासदार निधीतून देण्यात आलेल्या 16 रुग्णवाहिका या मर्जीतील संस्थांना खिरापतीप्रमाणे वाटप करण्यात आल्या असा आरोप होत आहे. या संस्थांची कुठलीही विश्वासहार्यता तपासण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप ही हरिहर पाटील यांनी केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत संस्था आणि रुग्णवाहिका या दोन्हीही गायब असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या आकाशात उडाल्या की जमिनीत गाडल्या गेल्या असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे या चौकशीचा कुठलाही अहवाल दोन्ही विभागाने अद्याप पर्यंत सादर केलेला नाही. याबाबत तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाही. रुग्णवाहिका या अवैध कामांसाठी याचा वापर केला जात असल्याचा संशय हरिहर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world