- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या महागाईमुळे नागरिकांना वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे
- जळगावातील सराफा बाजारात सोन्याचे दर वाढत असूनही ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे
- नागरिक पारंपरिक गुंतवणूक आणि सुरक्षित बचतीच्या दृष्टीने सोनं खरेदी करत असून भाव वाढण्याची भीती व्यक्त करतात
मंगेश जोशी
देशात वाढत्या महागाई आणि आयात खर्चाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचे आवाहन केलं आहे. मात्र सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावात या आवाहनाचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असतानाही जळगावातील सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय सोने आता खरेदी केले नाही आणि पुढे त्याचे दर वाढतच राहीले तर काय करणार असा प्रश्न अनेकांना आहे. त्यामुळे ते आताच सोने खरेदी करत असल्याचं ही दिसून येत आहे.
सध्या लग्नसराई आहे. त्यामुळे सोने खरेदीचा ओघ पाहायला मिळत आहे. पारंपरिक गुंतवणूक आणि सुरक्षित बचतीचा पर्याय म्हणून नागरिक अजूनही सोन्याला प्राधान्य देत आहेत. वर्षभर सोनं खरेदी करू नका हे आवाहन सर्वसामान्यांसाठी व्यवहार्य नसल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक कुटुंबांमध्ये सोनं हे केवळ दागिना नसून भविष्यासाठीची बचत आहे. शिवाय गरजेच्या वेळी आधार मानला जातो. दर वाढत असतानाही पुढे आणखी महागाई वाढण्याची भीती अनेकांना आहे. ही भीती त्यांच्यापासून लपलेली नाही.
आज घेतलेलं सोनं उद्या महाग पडेल या मानसिकतेतून नागरिक खरेदी करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे लोक सोने खरेदीसाठी बाहेर पडत आहे. काहींनी तर अगावू बुकींग ही केलं आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आव्हान केलं असलं तरी मात्र हे सर्वसामान्यासाठी परवडणारं नाही असं चित्र आहे. त्यामुळे त्याला हवा तसा प्रतिसाद सुवर्णनगरीमध्ये मिळत नसल्याचं म्हणावं लागेल. शिवाय या गोष्टीला आणखी दोन ते तिन महिने लागू शकतात असा सोने विक्रेत्याचं म्हणणं आहे. कदाचित त्यानंतर सोने विक्री ही कमी होईल असं ही त्यांनी सांगितलं आहे. मात्र सध्या तरी सोने खरेदीचा वेग पहिल्या प्रमाणेच आहे.
मोदींनी एका सभेमध्ये सोने वर्षभर खरेदी करू नये असे आवाहन केले होते. सोने खरेदी न करता देशकार्यासाठी हातभार लावा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या आवाहनानंतर मात्र त्यांच्यावर विरोधकांनी चारही बाजूने टिकेची झोड उठवली आहे. मोदींचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या अपयशाचा पाढा असल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. देशात मोठे आर्थिक संकट येणार हे आपण आधिच सांगितलं होतं. पण सरकार ते मान्य करत नव्हतं. शिवाय ते जनतेला ही सांगत नव्हतं असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. तर राज ठाकरे यांनी आता तरी मन की बात सोडा आणि अर्थ तज्ज्ञांच्या मन की बात सुना असा सल्ला त्यांना एका पत्राद्वारे दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world