मंगेश जोशी, जळगाव
जळगाव जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे महिलांचा संयम सुटला आहे. अनेक महिने उलटून आणि सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करूनही खात्यात पैसे जमा न झाल्याने आज शेकडो महिलांनी आक्रमक पवित्रा घेत थेट शासकीय कार्यालयात घुसखोरी केली.
राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे पैसे रखडल्याने जळगाव शहरात आज मोठा उद्रेक पाहायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून बॅंकेचे उंबरठे झिजवूनही खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेकडो संतप्त महिलांनी आज थेट जळगाव महिला व बाल विकास कल्याण कार्यालयात घुसखोरी केली. "आमचे पैसे कुठे आहेत? लवकरात लवकर पैसे द्या!" अशा घोषणांनी संपूर्ण कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
लाखो महिला अद्याप लाभापासून वंचित
जळगाव जिल्ह्यातील आकडेवारी पाहता, सुमारे 10 लाख 50 हजार महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, प्रशासकीय सावळागोंधळामुळे यातील 1 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. विशेष म्हणजे, या महिलांनी वारंवार सांगूनही पुन्हा पुन्हा KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तरीही तांत्रिक अडचणींचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
(नक्की वाचा- Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप, कोण-कोणत्या बँका होणार सहभागी? काय आहेत मागण्या?)
तांत्रिक घोळ आणि प्रशासनाचे उत्तर
आंदोलक महिलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर प्रशासनाकडून सारवासारव करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, KYC मधील त्रुटी जसे आधार कार्ड आणि बँक खात्यावरील नावातील तफावत, बँक खाते लिंक नसणे, आधार 'सीडिंग' प्रक्रियेत तांत्रिक चुका होणे अशा कारणांमुळे पैसे जमा झाले नाहीत.
(नक्की वाचा- Solapur News: जि.प. निवडणुकीसाठी लंडनच्या बॅरिस्टर पदवीचा त्याग; 24 वर्षांच्या या उमेदवाराची जोरदार चर्चा)
आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात आणि घरखर्चासाठी या पैशांची मोठी अपेक्षा होती. मात्र, वारंवार फेऱ्या मारूनही प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. "जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही," असा पवित्रा काही महिलांनी घेतला होता. शेवटी, लवकरच त्रुटी दूर करून पैसे जमा केले जातील, या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world