जव्हारमध्ये आयसर टेम्पो आणि महिंद्रा मॅक्स गाडीचा भीषण अपघात झाला. सोमवारी (27 मे 2024) जव्हार- नाशिक मार्गावरील वाळवंडा गावाजवळ झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. तर सात जखमींना पुढील उपचारांसाठी नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय आणि तीन जणांना जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: जळगावात वादळीवाऱ्यामुळे कोसळले घर, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू)
निवृत्ती गणपत पागे (वय 68 वर्ष), सुंदराबाई निवृत्ती पागे (वय 65 वर्ष) आणि गंगुबाई दशरथ कोरडे (वय 65 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील रहिवासी महिंद्रा मॅक्स गाडीने विरारच्या जीवदानी देवी मंदिराच्या दर्शनासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
(नक्की वाचा: दारु दिली नाही म्हणून बार कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)
भीषण अपघातांची मालिका
पालघरमध्ये सोमवारी घडलेली अपघाताची ही तिसरी मोठी घटना आहे. याआधी विक्रमगड तालुक्यात झालेल्या अपघातात मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली.. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर वसईमध्ये भरधाव डम्परने पाच महिलांना चिरडले होते. यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता आणि तीन महिला जखमी झाल्या होत्या. भरधाव डम्परने मार्गावरील पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
(नक्की वाचा: पालघरमध्ये दोन विचित्र अपघातात 4 जणांचा मृत्यू, तर 4 जखमी)