पहिले दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर आज सत्ताधारी आणि विरोधकांमधील चिमटे आणि टोमणे ऐकायला मिळाले. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची बिनविरोध निवड करताना अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी जयंत पाटलांनी राहुल नार्वेकरांना चिमटे काढले. त्यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. दरम्यान विधानसभेत जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाषणादरम्यान जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याचं दिसून येत आहे. जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जातील अशा चर्चा लोकसभेपासून सुरू आहे. अजित पवारांनी जयंत पाटलांसाठी एक मंत्रिपद ठेवल्याचंही म्हटलं जात होतं. त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
जयंत पाटील आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, अजितदादांचं माझ्या बोलण्यावर जास्त लक्ष असतं. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, लक्ष असून उपयोग काय तुम्ही प्रतिसाद देत नाही. यावर प्रत्युत्तरात ते म्हणाले, त्यावर आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे दादा. योग्यवेळी योग्य निर्णय, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी करताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
नक्की वाचा - "नाना पटोलेंनी वाट मोकळी केली म्हणून... "देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच भाषणात मानले आभार
जयंत पाटलांचे चिमटे...
अजित पवारांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर जयंत पाटलांनी राहुल नार्वेकरांचीही शाळा घेतली. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही चिमटे काढले आहेत. ते म्हणाले की, नार्वेकरांना मी खासगीत सांगायचो की पुढच्या वेळी मंत्री व्हा. मात्र विधानसभा अध्यक्षपदी असताना आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी असा निकाल दिला की सुप्रीम कोर्टालाही अजून विचार करावा लागतोय, असं म्हणत जयंत पाटलांनी चिमटा काढला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world